Ahmednagar News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाक् युद्ध रंगू लागले आहे. आजी-माजी आमदार एकमेकांची उणी-धुणी काढून मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहेत. पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातील भाजपच्या आमदार मोनिका राजळे या देखील मतदारसंघात अधिक अॅक्टिव्ह झाल्या आहेत.
यातून त्या विरोधकांवर तुटून पडत आहेत. अशीच त्यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे नाव न घेता टीका केली. चंद्रशेखर घुले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत. आमदार राजळे यांनी महायुतीमधील मित्र पक्षाच्या माजी आमदारांवरच निशाणा साधला.
भाजप (BJP) आमदार मोनिका राजळे शेवगावमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुलेंवर निशाणा साधला. जे दहा वर्ष घराबाहेर पडले नाहीत, त्यांना मतदारसंघाचा विकास दिसू शकत नाही. आणि त्यांना आता लोकांची आठवण होऊ लागली आहे. मतदारांना माहीत आहे की, राजकारण आणि समाजकारण कोणत्या दिशेला चालले आहे. त्यामुळे मतदारच करेक्ट कार्यक्रम करतील, असे राजळे यांनी म्हटले.
गेल्या दहा वर्षात मतदारसंघातील वाड्या-वस्तींवर पोचले नाही, असे नाही. विकासाची कामे मतदारसंघातील प्रत्येक गावात आणि वाडी वस्तीवर नेली. 10 वर्षात तालुक्यात कोणीच फिरत नव्हते. आता सत्कार, गाण्यांचा कार्यक्रम, वाढदिवस, एवढेच काय दशक्रिया देखील आता माजी आमदार सोडत नाहीत. वाढदिवसाचा केक रस्त्यावर येऊन कापायला सुरवात केली आहे. आता हेच आमदारांनी 10 वर्षात काय विकास केला म्हणत आहेत. परंतु हेच दहा वर्षात कधी घराबाहेर पडले नाही, त्यामुळे त्यांना विकास दिसत नाही. गाव, वाडी, वस्ती त्यांना ओळखता येईना. आज ते ज्या रस्त्याने गावांगावांमध्ये फिरत आहेत, ते भाजप सरकारच्या काळात झाले आहेत, असे टोला देखील राजळे यांनी घुले यांना लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार चंद्रशेखर घुले पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात प्रचंड अॅक्टिव्ह झाले आहेत. ही माझी शेवटची निवडणूक म्हणत, ते मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. या महिन्याभरात त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 13 ऑगस्टला बोधेगावमध्ये खेळ पैठणीचा कार्यक्रम घेत आहेत. 16 ऑगस्टला शेवगावमध्ये युवकांचा मेळावा आयोजित केला आहे. चंद्रशेखर घुले यांनी आमदार राजळे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
शेवगाव व पाथर्डी हे दोन्ही तालुके मतदारसंघात येतात. हे लोक आपल्या तालुक्यात येऊन विकासाची कामे करण्याऐवजी फक्त आपल्यामध्ये वाद लावतात. यातून त्यांना मते मिळतात. त्यांना आता थांबवू या. आपल्या तालुक्याचा आणि हक्काचा आमदार विधानसभेत पाठवण्यासाठी तालुक्यातील सर्व मतदारांनी एकसंघ राहिल्यास आपण निवडणूक जिंकू शकतो. शेवगाव तालुक्यात सव्वादोन लाखाच्या पुढे मतदार असून सुद्धा आपल्या तालुक्याचा आमदार का होत नाही? आगामी निवडणुकीमध्ये युवकांनी पुढाकार घेऊन निवडणूक कशी जिंकून आणता येईल,यासाठी एकनिष्ठने काम करण्याचे आवाहन घुले यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.