Rajendra Raut sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ST कर्मचाऱ्यांसमोर बोलताना आमदार राऊतांचा गौप्यस्फोट : ...यामुळेच मी शिवसेना सोडली

राज्यातील एसटी महामंडळातील 36 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

प्रशांत काळे

बार्शी : राज्यात एसटी महामंडळातील (ST strike) कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला आहे. राज्य सरकार 376 कर्मचाऱ्यांना निलंबित करुन संप चिरडण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. महामंडळातील 1 लाख 20 हजार कर्मचाऱ्यांचा उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला असून भाजपचे 106 आमदार व अपक्ष चार आमदार डिसेंबरमध्ये होणाऱ्या अधिवेशनात सरकारवर वाघासारखे तुटून पडणार आहेत, असा इशारा आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

बार्शी आगारासह सोलापूर जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे सुमारे साडेसातशे कर्मचारी संपामध्ये सहभागी झाल्याने प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. बुधवारी सकाळी आमदार राऊत यांनी बार्शी आगारातील कर्मचाऱ्यांची भेट घेतली. मंगळवारी रात्रीच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेशी झालेल्या चर्चेनंतर जिल्ह्यातील भाजपचे सर्व खासदार, आमदार दोन दिवसांत एकत्र येऊन सोलापूर येथील महामंडळाच्या कार्यालयासमोर कामगारांना जाहीर पाठिंबा देणार आहोत. एसटीची प्रवासी संख्या मोठी असून फुकटच्या सवलती देणे ही दुर्दैवी घटना आहे. कोट्यवधी रुपये बँकेत असलेला अपंग एसटीने प्रवास करतो अन् स्वतःसोबत अजून एक फुकट नेतो कसे महामंडळ तोट्यात येणार नाही, बस खरेदी, टायर खरेदीमध्ये टेंडर मोठ्या रकमेचे असून प्रामाणिक हेतू नसल्यानेच महामंडळाचा गाडा नफ्यात नाही, असेही राऊत म्हणाले.

सरकारमध्ये काही जणांची अनुदान वाटण्याची स्पर्धाच लागली आहे. सासर्‍याने हुंडा दिल्यासारखे अनुदान वाटप करीत असून खासगी बस सुरु केल्याने किती नुकसान झाले, किती अपघात झाले, किती मृत्यू झाले याचाही विचार होणे गरजेचे आहे. राज्यातील एसटी महामंडळामध्ये पाच संघटना असून तुम्ही सर्वजण एकत्र या सरकार चार दिवसांत नांगी टाकेल असेही आमदार राऊत म्हणाले. मी शिवसेना यामुळेच सोडली आहे पक्षात असताना बार्शी आगाराचे इंदापूरच्या धर्तीवर उभारणीचा प्रस्ताव दिला होता. आरक्षित जागा देऊन डेपो, बस दुरुस्ती बाहेर नेऊन मध्यवर्ती भागात शॉपिंग सेंटर उभारुन प्रशस्त बसस्थानक होणार होते. तीनदा भेटूनही मंत्रिमहोदयांनी सहकार्य केले नाही. शेतकरी आत्महत्या करीत होते आता राज्यातील एसटी महामंडळातील 36 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या घटनेचा जाब शासनाला द्यावाच लागेल. न्यायालय दोन्ही बाजू ऐकून निर्णय देणारच आहे असेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT