Ram Shinde Vs Rohit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Shinde Vs Rohit Pawar : आमदार शिंदेंनी आमदार पवारांवर, अशी केली कुरघोडी

Pradeep Pendhare

Ahmednagar News : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यात रंगलेला 'MIDC-MIDC'च्या लढाईत भाजप आमदार शिंदे यांनी आमदार पवारांवर कुरघोडी केली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार शिंदे यांनी केलेली कुरघोडी राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.

आमदार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवलेल्या 'MIDC' प्रस्तावाला महाराष्ट्र औद्योगिक विभागाच्या उच्चाधिकारी समितीने मंजुरी दिली. आमदार पवारांच्या कर्जत-जामखेडमधील राजकीय अस्तित्त्वाला हा मोठा धक्का मानला जात आहे. या 'MIDC' मंजुरीचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीत उमटणार असून, शिंदे आणि पवार एकमेकांना घेरणार, असे दिसते.

कर्जत-जामखेड तालुक्यातील 'MIDC'चा मुद्दा राज्यात चांगलाच गाजला. भाजप आमदार प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात 'MIDC' वरून राजकारण रंगले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना प्रस्ताव आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे सादर केला होता. 'मविआ'चे सरकार गेल्यानंतर भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांनी या प्रस्तावावर कुरघोडी केली. देशद्रोही नीरव मोदी याच्या जमिनीबाबत चर्चा झाली का? वनविभागाची जागाच का घेतली? पाटेगाव ग्रामपंचायतीच विरोध का?, असे अनेक प्रश्न राम शिंदे यांनी उपस्थित केले.

आमदार रोहित पवार यांनी जामखेडमधील 'MIDC'साठी मुंबईतील मंत्रालयाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उपोषण केले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EKnath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन दिले. याच दरम्यान नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन 'MIDC'बाबत बैठका घेतल्या. या बैठकांना बोलवले नसल्यावरून आमदार पवार यांनी सरकारवर निशाणा साधला होता.

मुंबई पावसाळी अधिवेशनावेळी 'MIDC'चा प्रश्न निकाली काढण्यासाठी आमदार पवार यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार अधिवशेनशाच्या शेवटच्या आठवड्यात आमदार पवार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उपोषणाला बसले होते. मंत्री शंभुराज देसाई यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सभापती राहुल नार्वेकर, मंत्री उदय सामंत यांच्या आश्वासनानंतर आमदार पवार यांनी आंदोलन मागे घेतले. या दरम्यान, आमदार शिंदे यांनी 'आगे आगे होता है क्या', असे सूचक इशारा देत, 'वेट अॅण्ड वाॅच'ची भूमिका घेतली. कागदपत्रांची जुळवाजुळव करत आमदार शिंदे यांनी कर्जत तालुक्यातील कोंभळी आणि खांडवी शिवारात 'MIDC'चा प्रस्ताव मंजूर करून घेतला.

खासगी क्षेत्र 246.05 हेक्टर संपादित होणार

कर्जत तालुक्यात 'MIDC' व्हावी यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. कर्जत तालुक्यातील कोंभळी 'MIDC'साठी मऔवि अधिनियम 1961 अन्वये प्रकरण 6 व कलम 2 खंड (ग) लागु करण्यास उद्योग विभागाच्या उच्चाधिकार समितीची मान्यता दिली आहे. यामुळे आता भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 'MIDC'ला अंतरिम मंजुरी मिळाल्यामुळे मतदारसंघातील हजारो युवकांची स्वप्नपूर्ती झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे युवा वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोंभळी शिवारातील खाजगी 168.23 हेक्टर आर व मौजे खांडवी शिवारातील 77.82 हेक्टर आर, अशी एकुण खासगी क्षेत्र 246.05 हेक्टर आर जमीन संपादित करण्यास उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT