Dr Radhakrishna Vikhe & Ajit Pawar. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : विखे पाटील यांच्या चाचपणीने अजित पवारांच्या आमदारांची धाकधूक वाढली

Sampat Devgire

Nashik BJP News: महायुतीतील मोठा भाऊ असलेला भाजप आज नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्रपणे चाचपणी करणार आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या आमदारांनी पुरेसे सहकार्य केले नसल्याची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक होत असल्याने अजित पवार गटाचे आमदार सावध झाले आहेत.

महाविकास आघाडी कडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष सध्या राजकीय राजकीय सोय आणि सहकाऱ्यांवर राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी स्वबळाची भाषा करीत आहेत. त्यात आता भाजपने एक पाऊल पुढे टाकले आहे.

महसूल मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यासंदर्भात आज नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ मतदारसंघातील इच्छुक आणि कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेणार आहेत. डॉ विखे पाटील नाशिकला येत असल्याने निवडणुकीसाठी ते काय भूमिका घेतात, याला महत्त्व आहे.

विखे पाटील हे निवडणुकांच्या राजकारणात माहीर मानले जातात. इच्छुक उमेदवारांची चाचपणी व पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेण्यासाठी ते प्रत्येकाशी चर्चा करणार आहे. त्यामुळे महायुतीचा सहकारी पक्ष आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक सहा आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सावध झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत विखे पाटील यांच्याकडेच दिंडोरी मतदारसंघाचा कार्यभार होता. मात्र या निवडणुकीत पक्षाला राज्यात सगळीकडेच मोठा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून आता बूथ प्रमुखांना सक्रीय करण्यावर भर दिला जाणार आहे.

जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत. उर्वरित आठ मतदारसंघात महायुतीच्या सहकारी पक्षांचे आमदार आहेत. या आमदारांकडून भाजप पदाधिकाऱ्यांना फारसे महत्त्व दिले जात नाही. याबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत.

विशेषतः लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांनी भाजपला मदत केली नाही. काही ठिकाणी भाजपच्या विरोधात काम केले, अशी तक्रार जिल्हा अध्यक्षांनी यापूर्वीच वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाविषयीचा संताप आजच्या आढावा बैठकीत पुन्हा एकदा व्यक्त होण्याची शक्यता आहे.

तसे झाल्यास भाजपकडून आक्रमक भूमिका घेतली जाऊ शकतो. यासंदर्भात महसूल मंत्री विखे पाटील आजच्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेणार आहेत. त्यानंतर सर्व १५ विधानसभा मतदारसंघात स्वबळाची तयारी कितपत शक्य आहे, याचाही विचार होईल.

आजच्या बैठकीतील आढावा प्रदेशाध्यक्षांना सादर केला जाणार आहे. महायुतीच्या जागा वाटपात या अहवालाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांनी सावध पावले टाकण्यात सुरुवात केली आहे. महसूल मंत्री विखे पाटील यांचे मिशन विधानसभा आजपासून सुरू झाल्याने राजकीय घडामोडींना वेग येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT