Drugs Political connection Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics: निवडणुकीच्या तोंडावर 'ड्र्ग्स'चा धमाका, 'चिपड्या' कोणत्या भाजप आमदाराला भोवणार?

Sampat Devgire

Nashik BJP News: दोन वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचा संबंध थेट भाजपच्या एका महिला आमदाराशी जोडला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रकार घडल्याने भाजप आणि संबंधित या महिला आमदार पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

शहरातील वडाळा येथे दोन वर्षांपूर्वी छोटी भाभी या नावाने चर्चीत असलेल्या महिलेला ५४.४० ग्रॅम एमडी (मॅफेड्रोन) या ड्रग्जसह पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणातील अन्य आरोपी पसार झाले होते. शहरात ड्रग्ज सापडल्याने खळबळ उडाली होती. दोन वर्षांनी पोलिसांनी या प्रकरणात मोठे पाऊल उचचले.

यातील आरोपींचा संबंध थेट भाजपच्या एका महिला आमदाराशी जोडण्यात आला होता. पोलिसांच्या तपासातही त्याला पुष्टी मिळाल्याचे बोलले जाते. त्यामुळे पोलिस त्यातील सत्यतता पडताळून पहाच आहे.

दोन वर्षांनी यातील संशयित आरोपी चिपड्या उर्फ इरफान शेख, नूर मोहम्मद शेख (रा. वडाळा गाव) आणि करण सोनटक्के या दोघांना पोलिसांनी अटक केली. या दोघांना अटक केल्याने भाजप चांगलाच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. यातील चिपड्या भाजपचा पदाधिकारी असल्याचे बोलले जाते.

अटक केलेल्या इरफान शेख हा विविध प्रकरणांमध्ये संशयित आहे. त्याने गुन्हेगारांना आणि अमली पदार्थ विक्रेत्यांना राजकीय पाठबळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. पोलीस तपासातूनच हे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी भाजपचे निरीक्षक विधानसभा निवडणूक आढावा घेण्यासाठी आले होते.

यावेळी झालेल्या भाजपच्या बैठकीत इरफान शेख यांनी भाग घेतल्याचे बोलले जाते. त्याचे पक्षाच्या महिला आमदाराशी घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप केला जातो. यावेळी निरीक्षकांनी तीन पर्याय सुचविण्याबाबत मतदान घेतले होते. त्यात देखील इरफान शेख यांने मतदान केल्याची चर्चा आहे.

या प्रकरणाची चर्चा विधिमंडळात देखील झाली होती. पावसाळी अधिवेशनात या विषयाला अनुषंगून शिवसेना नेत्यांच्या विरोधात हक्कभंगाची तक्रार करण्यात आली होती. ड्रग्स प्रकरणाशी संबंधित कारवाई झालेल्या महिलेचा छोटी भाभी असा उल्लेख करण्यात आला होता.

शिवसेना नेत्यांनी बडी भाभी असा केला होता. त्यावरून हा वाद पेटला होता. त्यावर सुषमा अंधारे यांनी देखील या आरोपांचा पुनरूच्चार करीत संबंधीत आमदाराला आव्हान दिले होते. त्यामुळे यावरून सत्ताधारी पक्षाचे नेते व शिवसेना ठाकरे गटात चांगलीच जुंपली होती.

गेले काही दिवस शहराच्या राजकारणात भाभी या नावावरून सातत्याने आरोप, प्रत्यारोप होत आहेत. छोटी भाभी कोण?, तीचा कोणाशी संबंध आहे अशी चर्चा होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच पोलिसांनी केलेल्या कारवाईत ड्रग्ज विक्रीचे हे प्रकरण उकरून काढले आहे.

भारतीय जनता पक्षाशी संबंधित दोघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. अन्य एका आरोपीचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाच्या तपासात आणखी काय आढळते याची उत्सुकता आहे. एकंदरच शहराला त्रस्त करणाऱ्या ड्रग आणि हत्या यांसारख्या गुन्हेगारी प्रकरणात आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा संबंध जोडला जाऊ लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT