Nashik News : तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. लवकरच निवडणुकीची घोषणा होणार असल्याचे गृहीत धरून प्रत्येक पक्ष आता जोरदार मोर्चेबांधणी करीत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटपाची चर्चा सुरु आहे. त्यातच आता महायुतीने उत्तर महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी विशेष रणनीती आखली आहे.
महायुतीने येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात महायुतीने 42 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असून कमकुवत मतदारसंघ जिंकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नाशिक येथे नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत भाजपच्या (Bjp) उत्तर महाराष्ट्रस्तरीय सुकाणू समितीची बैठक झाली. या समितीत नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यातील 30 सदस्यांचा समावेश आहे. (Mahayuti News)
यावेळी सर्व मतदारसंघांसह कमकुवत जागांविषयी चर्चा करण्यात आली. नाशिक विभागात सद्यस्थितीत 47 पैकी 34 विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात असून ही संख्या 42 वर नेण्याचे लक्ष्य त्यांनी दिले आहे. विभागातील पाच जिल्ह्यांत महायुतीसाठी 16 मतदारसंघ नाजूक स्थितीत असल्याचा निष्कर्ष अभ्यासाअंती काढला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीत महायुतीला मताधिक्य असलेले मतदारसंघ ‘अ’ गटात आहेत. ते मजबूत मानले जातात. विरोधकांना आघाडी मिळालेल्या मतदारसंघांचा समावेश कमकुवत म्हणजे ’ब‘ गटात करण्यात आला आहे. लोकसभेवेळी विभागात महायुतीचे उमेदवार 13 विधानसभा मतदारसंघात कमी-अधिक फरकाने मागे राहिले होते.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, निफाड, येवला, सिन्नर, देवळाली, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य अशा आठ मतदारसंघांचा समावेश आहे. नंदुरबारमधील तळोदा, धुळ्यातील शिंदखेडा आणि साक्री तर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महायुती मागे होती. अन्य तीन मतदारसंघही याच गटात असले तरी त्यांची स्पष्टता झालेली नाही.
'या' 16 मतदारसंघात करण्यात येणार मायक्रोप्लॅनिंग
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर महाराष्ट्रातील 16 मतदारसंघात सुक्ष्म पातळीवर काम करण्याची सुचना केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी केली. या सर्व जागा जिंकण्यासाठी स्थानिक पातळीवर काय करणे आवश्यक आहे, याचा अहवाल सदस्यांना सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार हे सदस्य लवकरच अहवाल सादर करणार असल्याचे समजते.
'या' मतदारसंघांमध्ये घ्यावी लागणार अधिक मेहनत
उत्तर महाराष्ट्रातील 'ब' गटात समाविष्ट असंलेल्या विधानसभा मतदारसंघात विजयासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत. त्यात भाजप लोकसभेत मागे राहिलेल्या 13 जागांचाही समावेश असल्याचे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लोकसभेतील स्थिती लक्षात घेऊन मतदान केंद्रांचेही चार गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. जिथे सर्वात कमी वा त्याहून काहिसे अधिक मतदान झाले, त्या भागात घरोघरी भेट देत मतांची टक्केवारी किमान किमान दुपटीने वाढविण्याचा कार्यक्रम देण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.