Nashik Political News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे भास्करराव भगरे उमेदवार आहेत. मात्र विरोधकांनी नियोजन करून उमेदवारांच्या यादीत आणखी एका भगरे यांची भर पडली आहे. त्यामुळे मतदान करताना गोंधळ होण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार Sharad Pawar गटाचे निवडणूक चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे. मात्र निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हांच्या यादीत ट्रंपेट या वाद्याचा उल्लेख देखील तुतारी असा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात विरोधकांनी जाणीवपूर्वक उमेदवार उभे करून त्यांना तुतारी चिन्ह मिळेल अशी तजवीज केली आहे. त्यामुळे मतदान करताना गोंधळ होण्याची शक्यता आहे.
दिंडोरी मतदारसंघातही त्याचा प्रत्यय आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्करराव भगरे Bhaskar Bhagre हे शिक्षक आहेत. त्यांचा उल्लेख देखील भगरे सर असा केला जातो. त्यांचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हेच आहे. मात्र भगरे यांच्या विरोधकांनी विशेष प्रयत्न करून अन्य एका नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरविले आहे.
अपक्ष उमेदवार असलेल्या या उमेदवाराचे नाव बाबू भगरे असे आहे. त्यांच्या नावापुढे कंसात सर असे संबोधण्यात आले आहे. त्यांचे निशाणी देखील तुतारी आहे त्यामुळे आदिवासी मतदारांचा मतदान करताना गोंधळ होऊ शकतो. यावरून भगरे समर्थकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे.
सध्या मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. असे असतानाच मतदान यंत्रावरील नावांच्या यादीत 'भगरे' आणि 'सर' या दोन नावांवरून चांगलाच गोंधळ निर्माण होऊ लागला आहे. त्याबाबत वगैरे यांच्या समर्थकांनी थेट निवडणूक आयोगालाच Election Commission दोषी ठरविले आहे. निवडणूक आयोग आता दबावाखाली काम करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावर समाज माध्यमांवर देखील टीका होऊ लागली आहे. ज्यांच्या नावापुढे 'सर' असा उल्लेख आहे, ते भगरे प्रत्यक्षात शिक्षक नाहीत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भगरे हे प्रत्यक्षात शिक्षक आहेत. मात्र त्यांच्या नावापुढे सर हा उल्लेख नाही. हे जाणीवपूर्वक घडविण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते करीत आहेत.
निवडणूक प्रचार आता शेवटच्या चरणात पोहोचला आहे. त्यामुळे राजकीय कार्यकर्ते प्रचारातील विविध मुद्दे आणि निवडणूक प्रक्रिया यातील त्रुटी शोधून त्यावर बोट ठेवू लागले आहेत. दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे, महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार Bharati Pawar आणि वंचित बहुजन आघाडीच्या मालती थवील यांसह दहा उमेदवार आहेत. त्यामुळे ही निवडणूक अतिशय रंजक होण्याची चिन्हे आहेत.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.