Satish Kulkarni, Mayor Of Nashik
Satish Kulkarni, Mayor Of Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आगामी महापालिका निवडणुक भाजप विकासाच्या मुद्दयावरच लढणार!

Sampat Devgire

नाशिक : महापालिकेमार्फत शहर विकास करतानाच केंद्र सरकारच्या मार्फतही नाशिकला भरभरून मिळाले. भारतमाला योजनेंतर्गत द्वारका ते नाशिक रोड दरम्यान डबलडेकर उड्डाणपुल, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्गाशी संलग्न महामार्ग विस्तारीकरण, ग्रीन फिल्ड असे अनेक प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आगामी महापालिका निवडणूक विकासाच्या विषयावरच लढणार आहे, असे महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांनी सांगितले.

कुलकर्णी यांनी महापौर पदाचा कार्यभार स्विकारला त्याला दोन वर्षे पूर्ण झाली. यासंदर्भात ते बोलत होते. ते म्हणाले, दोन वर्षांपूर्वी शहराचा प्रथम नागरिक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याचवेळी न भूतो असे काम करण्याचा निश्‍चय केला. द्विवार्षिक पूर्ती होत असताना शब्दाला जागल्याचे मनोमन समाधान वाटते. शहर समृद्धीच्या वाटेवर आणल्याचा सार्थ अभिमान आहे. मागील २५ वर्षात न सुटलेले प्रश्‍न सोडविल्याने न भूतो असे काम माझ्या कारकिर्दीत झाले. महापौर म्हणून सक्षम नेतृत्व केलेच तेवढ्याच ताकदीने कामेदेखील केली. ‘रामायण’ बंगल्यावर बसण्यापुरता महापौर झालो नाही, कोरोनाकाळातही लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या.

गेल्या पंचवीस वर्षांपासून नगरसेवक असलेल्या सतीश कुलकर्णी यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ शी संवाद साधताना ते बोलत होते. शहरात पंचवीस वर्षांपासून अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्यातील महत्त्वाचे प्रश्‍न माझ्या कारकिर्दीत सोडविले. महापालिकेच्या करोडो रुपयांच्या मिळकतींची दुर्दशा झाली, त्या मिळकती बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेतला. बीओटीमुळे २२ हजार लोकांना रोजगार तर मिळेलच, त्याशिवाय महापालिकेला एक रुपया खर्च न करता दोन विभागीय कार्यालय, एक रुग्णालय व तीन बहुमजली वाहनतळ बांधून मिळणार आहे. या व्यतिरिक्त ११०- १२५ कोटी रुपयांचे उत्पन्नदेखील मिळेल.

आयटी हब, लॉजिस्टिक पार्क, यांत्रिकी झाडूच्या साहाय्याने रिंगरोडची स्वच्छता, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून नाशिक रोड भागात पाणीपुरवठा योजना, दादासाहेब फाळके स्मारकाला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेष योजना, महापुरुषांच्या पुतळ्यांची उभारणी, फायर ब्रिगेडच्या ताफ्यात नवीन वाहने, शहरात वीस ठिकाणी इलेक्ट्रीक वाहनांसाठी बॅटरी चार्जिंग स्टेशन, मुस्लिम धर्मियांच्या कब्रस्तानासाठी जागा, विद्युतदाहिनी आदी महत्त्वाच्या कामे प्रलंबित कामे मार्गी लावल्याने शहर खऱ्या अर्थाने समृद्धीच्या वाटेवर असल्याचा अभिमान असल्याचे महापौर कुलकर्णी म्हणाले.

गोदावरी व उपनद्यांच्या विकासासाठी नमामि गोदा प्रकल्प केंद्र सरकारच्या मदतीने मार्गी लागला. सविस्तर प्रकल्प अहवाल सादर झाला असून, लवकरच निधी प्राप्त होऊन गोदावरी व उपनद्यांची समस्या कायमस्वरूपी सोडविली जाणार असल्याचे महापौर म्हणाले. कोरोनाकाळात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जनजागृती, सव्वातीन लाख विद्यार्थ्यांना जलनेती पुस्तकाचे वाटप केले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT