BJP Flag Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon Election Controversy : "ना अर्ज भरला, ना सही केली!" निवडणूक आयोगाच्या यादीत नाव, उमेदवार म्हणते मी 'फॉर्मच भरला नाही'! मालेगावात 'अजब' प्रकार उघड

Malegaon local body election BJP controversy: मालेगावात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने अर्ज न भरताच निवडणुकीत प्रवेश केला आहे.

Sampat Devgire

Malegaon BJP News : राज्यभर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कामकाज वादाचा विषय ठरले आहेत. विरोधकांकडून त्यावर टीका होत आहे. अशातच मालेगाव महापालिका निवडणुकीत धक्कादायक प्रकार पुढे आला. मालेगाव महापालिकेची निवडणूक वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. येथे भाजपच्या महिला नेत्याला थेट अपक्ष ठरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा हा निर्णय वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय ठरत आहे.

मालेगाव महापालिका निवडणुकीत प्रभाग "10 क" मध्ये हा अजब प्रकार घडला. भाजपच्या प्रतीक्षा भूपाल भोसले या अपक्ष उमेदवार ठरल्या. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना चिन्ह वाटप देखील केले. या निर्णयावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

भाजपच्या प्रतीक्षा भोसले यांनी पक्षाकडे प्रभाग 10 मधून उमेदवारीची मागणी केली होती. यासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सर्व तयारी केली होती. त्यानुसार त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्याच्या तयारीने गेल्या होत्या.

प्रतीक्षा भोसले या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले असता पक्षाने तेथून वेगळ्याच उमेदवाराला भाजपची उमेदवारी दिली. पक्षाने एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे श्रीमती प्रतीक्षा भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता त्या माघारी फिरल्या.

यावेळी संबंधित उमेदवारी अर्ज टेबलावरच पडून होता. माघारी नंतर मात्र उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव आले. निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना चिन्ह वाटप केले. हा प्रकार उघडकीस आल्यावर श्रीमती भोसले यांना धक्का बसला. त्यांनी घाई गडबडीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले.

आपण भाजप पक्षाशी एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. पक्षाने उमेदवारी नाकारली मात्र तरीही आपल्याला अपक्ष उमेदवारी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. मग आपले नाव उमेदवार यादीत कसे?

असा प्रश्न त्यांनी केला. त्यानंतर मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात एकच धावपळ उडाली. हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्याची नोंदणी रजिस्टर मध्ये करण्यात आलेली नाही. स्वाक्षरीही आपण केली नाही असा धक्कादायक खुलासा श्रीमती भोसले यांनी केला.

एकीकडे भाजप विरोधकांचे उमेदवारी अर्ज विविध किरकोळ कारणे पुढे करून बाद केले जात आहेत. निर्णय अधिकाऱ्यांवर याबाबत पक्षपाताचा आरोप होत आहे. अशात भाजपच्या महिलेने उमेदवारी अर्ज दाखल न करताच तिला अपक्ष उमेदवार ठरविल्याने गोंधळ उडाला आहे.

यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी मात्र या प्रकरणावर कानावर हात ठेवले आहेत. प्रक्रियेनुसार कामकाज झाले आहे. अर्जासोबत सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्याने तो वैध ठरला. अर्ज भरायचा नव्हता तर त्यांनी तो सोबत घेऊन जाणे गरजेचे होते. आयोगाच्या नियमानुसार निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT