Madhukar Pichad
Madhukar Pichad Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपवासी मधुकर पिचड आदिवासींच्या राजकारणातून साईड ट्रॅक?

Sampat Devgire

नाशिक : सोनोशी येथे नुकताच राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचे भूमिपूजन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यातील व अकोला, इगतपुरी परिसरातील महत्त्वाच्या आदिवासी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र संयोजकांनी भाजपवासी झालेले, माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या कार्यक्षेत्रातील या कार्यक्रमात पिचड यांनाच डावलले. त्यांच्या समर्थकांनी दबाव आणल्यावर देखील संयोजक ठाम राहिल्याने श्री. पिचड यांना त्यांच्याच कार्यक्षेत्रात आदिवासी राजकारणातून साईड ट्रॅक केले जात आहे, की काय अशी चर्चा सुरु आहे.

सोनोशी ( ता. इगतपुरी) येथे आदिवासी क्रांतिकारकांच्या जयंतीनिमित्त स्मारकाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पद्मश्री राहीबाई पोपरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, देविदास पिंगळे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार निर्मला गावित, अकोल्याचे आमदार किरण लहामटे, नितीन पवार, सुनील भुसारा, दौलत दरोडा, अशोक भांगरे, शिवराम झोले, सोमनाथ जोशी असे विविध आदिवासी नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. मात्र भारतीय जनता पक्षात गेलेले माजी मंत्री मधुकर पिचड यांना निमंत्रण देण्यात आले नाही. संयोजक व बिरसा मुंडा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम यांनी याबाबत ठाम भूमिका घेतल्याने राज्याच्या आदिवासी राजकारणात आजवर महत्त्वाचे स्थान असलेल्या पिचड यांना त्यांच्या होम ग्राऊंडवर साईड ट्रॅक करण्यात आल्याचे चित्र होते.

या कार्यक्रमात संयोजकांनी शरद पवार हेच आदिवासींचे खरे सेनापती आहेत. आदिवासींचे विविध प्रश्न तेच सोडवू शकतात यांसह स्तुतीसुमने उधळली. त्याचवेळी केंद्र सरकारच्या आदिवासी विरोधा धोरणावर देखील टिका झाली. त्यामुळे भाजपमध्ये गेलेले आदिवासी नेते चांगलेच अस्वस्थ झाले होते. इगतपुरी हा अकोला लगतचा भाग आहे. ते मधुकर पिचड यांचे कार्यक्षेत्र असूनही आदिवासींच्या या मोठ्या कार्यक्रमाला त्यांना टाळले, हा चर्चेचा विषय ठरला.

यासंदर्भात श्री. पिचड यांचे समर्थक व पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळा लाहंगे म्हणाले, देशात लोकशाही आहे, कोणी कोणत्याही पक्षात गेले तरी त्या नेत्यांची मूळ जात थोडीच बदलते, कार्यक्रम जर आदिवासी क्रांतिकारकांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित केला होता. देशात अदिवासी बांधवांसाठी झपाटून काम करणाऱ्या व आमच्या दैवत मानलेल्या माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना डावलणे योग्य नाही. त्यामुळे आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. ज्यांच्या माध्यमातून बिरसा मुंडा ब्रिगेडचे कार्य चालवले जात आहे. ज्यांची पार्श्वभूमी बलात्कार, गुन्हेगार स्वरुपाची व समाजात दुही निर्माण करणारी आहे.

या कार्यक्रमाआधी श्री. पिचड यांच्या विविध समर्थकांनी त्यात श्री. पिचड यांना निमंत्रित करावे असा आग्रह धरला होता. मात्र संयोजकांनी त्यास स्पष्ट शब्दात नकार दिल्याचे कळते. सध्याचे केंद्रातील सरकार आदिवासींच्या विरोधात व त्यांना दडपण्याची भूमिका घेते, असा दावा करण्यात आला.

त्यावर पिचड समर्थकांनी देखील ताठर भूमिका घेत, संयोजकांना आम्ही आदिवासी समाजाचे नेते कधीच मानणार नाही. आदिवासी काय दूध खुळे आहेत का? युवा पिढीला भरकाटवून समाजात विकास कसा साधता येईल, यासाठी आम्ही लोकशाही मूल्यांची जोपासना करू. आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी आम्ही माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊ असे त्यांनी सांगितले. त्यामुळे एकंदरच श्री. पिचड यांना साईडट्रॅक केल्याने समर्थक अस्वस्थ असल्याचे चित्र आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT