Satyajeet Tambe & Shubhangi Patil
Satyajeet Tambe & Shubhangi Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Graduate Election: गोंधळामुळे पदवीधरांनी फिरवली मतदानाकडे पाठ!

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात पाचही जिल्ह्यांत सरासरी ४९.२८ टक्के मतदान झाले. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात सर्वाधिक ५१.४४ तर नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी ४५.८५ टक्के मतदान झाले. गत निवडणुकीत ५४ टक्के मतदान झाले होते. मतदारांत निरूत्साह दिसला. त्यामुळे प्रस्थापित सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) शुभांगी पाटील (Shubhangi Patil) दोघांचेही अंदाज व गणित बिघडू शकते. त्यामुळे उमेदवारांची चिंता वाढली. (Candidates expectation may gone wrong due to low voting)

धुळे जिल्ह्यात ५०.५० टक्के, तर नगर जिल्ह्यात ५०.४० टक्के झाले. नंदुरबार जिल्ह्यात ४९.६१ टक्के, तर सर्वाधिक कमी मतदान नाशिक जिल्ह्यात ४५.८५ टक्के नोंदविले गेले. शहरी भागातील मतदान केंद्रांवर मतदारांचा निरूत्साह होता. शासकीय अॅपमुळे अनेकांना मनस्ताप झाला. मतदारयादीतील घोळ, नावे सापडत नसल्याने मतदार व कार्यकर्ते हतबल झाल्याचे चित्र होते.

नाशिक जिल्ह्यात मतदारयाद्यांमधील घोळामुळे मतदान कमी झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. एकूण सोळा उमेदवार रिंगणात आहेत. रात्री उशिरापर्यंत मतपेट्या नाशिक तालुक्यातील सिद्ध पिंप्री येथील शासकीय गुदामात दाखल झाल्या. गुरुवारी (ता. २) सकाळपासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल.

राज्यभर चर्चेत राहिलेल्या विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी सकाळी आठ ते दुपारी चार यादरम्यान मतदान पार पडले. प्रामुख्याने अपक्ष सत्यजित तांबे व महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यात लढत असल्याचे चित्र निवडणुकीत दिसले. संगमनेरमध्ये सत्यजित यांनी मतदानाचा हक्क बजावला, तर धुळे येथे शुभांगी पाटील यांनी मतदान केले. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी आनंदवली येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसला नाही. मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याचे दिसून आल्यानंतर अनेक ठिकाणी राजकीय पक्षांकडून मतदारांना केंद्रापर्यंत आणले जात असल्याचे दिसून आले. दुपारी दोनपर्यंत नंदुरबार ३१.७३ टक्के, धुळे जिल्ह्यात ३४.०५, जळगावमध्ये ३०.९३ टक्के, नाशिकमध्ये २९.९२ टक्के, तर सर्वाधिक मतदार असलेल्या नगरमध्ये ३२.५५ टक्के, असे एकूण पाचही जिल्ह्यांत ३१.७१ टक्के मतदानाची नोंद झाली. दरम्यान, मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर अपक्ष सत्यजित तांबे व महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांनी विजयाचा दावा केला.

कमी टक्केवारीने हलली सूत्रे

दुपारी दोनपर्यंत अवघे ३२ टक्के मतदान झाल्याने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न झाले. अवघ्या दोन तासांत मतदानाची टक्केवारी १७.५७ ने वाढली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना मतदान केंद्रावर पोचविण्याचे आवाहन करण्यात आले.

काँग्रेस-भाजपचे साथ-साथ

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत भाजपकडून कुठल्या उमेदवाराला उघडपणे पाठिंबा जाहीर केला गेला नसला तरी शहरी व ग्रामीण भागातील सर्वच मतदान केंद्रांवर भाजपच्याच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची गर्दी होती. काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी मैदानात असले तरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराऐवजी अपक्ष तांबे यांच्याच बूथवर अधिक दिसले. शहरातील भाजप नगरसेवकांनी तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन सोशल मीडियावरून करत पाठिंब्याबाबत अखेर मौन सोडले. दिवसभरात महाविकास आघाडीच्या बूथवर कार्यकर्ते तुरळक प्रमाणात दिसले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील बूथवर येण्याचे टाळल्याचे दिसून आले.

मतदारयाद्यांमध्ये गोंधळ

मतदानाच्या दिवशी मतदारयाद्यांमध्ये मोठा गोंधळ दिसून आला. दोन-तीनदा नावे नोंदवूनदेखील मतदारयादीत नाव नसल्याने अनेक मतदारांना मतदान न करताच परतावे लागले. कॉलेज रोड भागात काँग्रेसचे स्वप्नील पाटील यांनी दीड हजार नावे नोंदविली; परंतु यातील एकही नाव यादीत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याचे नावे देवळा केंद्रात नोंदविले गेले, तर भाजपचे पदाधिकारी असलेले त्यांचे वडिलांचे नावच मतदारयादीतून गायब झाले. यादीतून नावे गायब होण्याबरोबरच नावांमध्ये देखील मोठ्या त्रुटी आढळल्या. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची नावे चुकल्याने त्यांना मतदान करता आले नाही. नावे नोंदवूनही मतदारयादीत नाही. नावे शोधण्यात अधिक गेलेला वेळ, मतदान केंद्रांवर एका मतदानासाठी तास ते दीड तास लागलेला वेळ यामुळे मतदारांमध्ये संताप व्यक्त केला गेला. हा सर्व गोंधळ उमेदवारांसाठी चिंतेचा विषय बनला. त्याचा फटका प्रस्थापित उमेदवाराला बसण्याची शक्यता काहींनी बोलून दाखवली. दोन्ही उमेदवारांची गणिते त्यामुळे विस्कटण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT