Deolali Cantonment  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : गरीब सरकारी अधिकारी निघाला कोट्याधीश ; 52 हजाराचे साडेपाच कोटी कसे झाले? CBI चक्रावली..

CBI Case registered Against Former Deolali Cantonment CEO Ajay Kumar : नाशिकच्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी सीईओ सीबीआयच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांच्या मालमत्तेचा तपशील समोर आला असून सेवाकाळातील उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती आढळून आली आहे.

Ganesh Sonawane

Nashik News : नाशिकच्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा 2012 च्या बॅचचे आयडीईएस (IDES) अधिकारी अजय कुमार यांच्या विरोधात आपल्या सेवाकाळातील उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या फिर्यादी नुसार संशयित अधिकारी अजय कुमार यांच्याकडे तब्बल 5 कोटी 72 लाख 79 हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याप्रकरणात अजय कुमार यांच्या पत्ती व आईविरोधातही गुन्ह्यास मदत केल्याचा आरोप ठेवत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे नाशिकसह संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 30 जून रोजी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई सीबीआयचे उपअधीक्षक रणजीत के. पांडे यांनी या संदर्भात तक्रार दिली होती. त्यानंतर याप्रकरणाचा तपास पुणे सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता.

याप्रकरणी सीबीआयने केलेल्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजय कुमार यांनी भ्रष्टाचारातून मिळवलेला काळा पैसा व संपत्ती लपवण्यासाठी तसेच ती कायदेशीररित्या हस्तांतरित करण्यासाठी त्यांच्या पत्नीने व आईने त्यांना थेट मदत केल्याचं तपासातून समोर आलं आहे. यासोबतच, एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कुटुंबानेही त्यांना या कामात साथ दिल्याची जोरदार चर्चा आहे.

सीबीआयने अजय कुमार यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांनुसार, तर त्यांच्या पत्नी व आई दोघींवर गुन्ह्यात मतद केल्याचा आरोप करत कलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

52 हजाराचे झाले 5 कोटी...

CBI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2014 ते 13 जून 2024 या 10 वर्षांच्या कालावधीत अजय कुमार यांच्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यात आली. तपासापूर्वी त्यांची मालमत्ता केवळ 52 हजार 428 रुपये इतकी होती. मात्र, तपास केला असता हा आकडा तब्बल 5 कोटी 59 लाख 67 हजार रुपयांपर्यंत पोहोचला.

कुमार यांनी या कालावधीत 5 कोटी 17 लाख 93 हजार रुपयांचा खर्च केला. त्यांच्या कायदेशीर उत्पन्नानुसार केवळ 13 लाख 64 हजार रुपयांची बचत अपेक्षित होती, मात्र त्यांच्याकडे त्या पेक्षा कितीतरी पट अधिक बेहिशेबी मालमत्ता आढळली, ज्याचा कोणताही कायदेशीर स्त्रोत ते सीबीआयला दाखवू शकले नाहीत. या प्रकरणाचा पुढील तपास पुणे सीबीआय करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT