Chandrakant Raghuvanshi News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातून विस्तवही जात नाही. काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केल्याशिवाय एकनाथ शिंदे यांचा दिवस जात नाही. मात्र शिंदे यांच्याच पक्षाच्या एका आमदाराने याबाबत या सर्व नेत्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयात कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता आणि कोणीही गरजू सहजपणे जातो. आपली कामे आणि अडचणी सांगतो. आणि तो प्रश्न सुटल्याचे समाधान घेऊन परत जात असतो. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे संबंध आहेत.
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयात काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, सभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, शरद पवार, विलासराव देशमुख, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे अशा विविध नेत्यांसमवेत आमदार रघुवंशी यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत.
आमदार रघुवंशी यांची ही कार्यशैली नंदुरबार शहरात आणि जिल्ह्यात विशेष चर्चेचा विषय आहे. त्याहूनही अधिक चर्चेचा विषय म्हणजे त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांचे ज्यांच्याशी राजकीय वैमानस्य आहे, अशा नेत्यांचे फोटोही येथे गुण्यागोविंदाने एकत्र आलेले दिसतात. रघुवंशी समर्थक देखील त्याबाबत अतिशय सहज असतात.
राजकारणात एकमेकांचा पानउतारा करण्याची संधी हे नेते सोडत नाहीत. मात्र आमदार रघुवंशी यांच्या कार्यालयात हे सर्व फोटो एकाच वेळी एकाच फ्लेक्स मध्ये लावलेले पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. त्यामुळे अनेकांना हा विषय बातमीचा तर नंदूरबारच्या लोकांना बातम्या पलिकडचा ठरतो.
यासंदर्भात आमदार रघुवंशी म्हणाले, मी तसा पूर्वश्रमीचा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मला अनेक कामांमध्ये मदत केली आहे. नंदुरबार आणि परिसरातील नागरिकांचे प्रश्न ज्यांनी ज्यांनी सोडवले त्या सगळ्यांचे मी सदैव आभार मानले आहेत. त्यामुळेच कृतज्ञता म्हणून त्या सगळ्यांचे फोटो माझ्या कार्यालयात लावलेले आहे. त्यात मला कोणताही राजकीय अभिनेवेश दाखवायचा नाही.
आमदार रघुवंशी हे सध्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात आहेत. त्यापूर्वी ते शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात होते. त्याआधी काँग्रेस पक्षातही काही काळ त्यांनी काम केले आहे. जनतेचे प्रश्न सोडवितांना ते राजकारण बाजूला ठेवून काम करतात.
त्यासाठी अगदी विरोधकांनाही बरोबर घेण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळेच आजही रघुवंशी यांच्यासमवेत विविध पक्षाचे नेते वावरताना दिसतात. त्यांची हीच कार्यशैली फोटोंच्या रूपाने त्यांच्या कार्यालयातही अवतरलेली आहे. त्यांचे हे वेगळेपण त्यांच्या विरोधकांनाही त्यांच्याकडे आकर्षित करण्यात कारणीभूत ठरते.
नंदुरबार नगरपालिकेत आमदार रघुवंशी यांचे वर्चस्व आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही त्यांना मनापासून साथ दिली आहे. त्यामुळे एक पक्ष विरहित नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या राजकीय विरोधकांना मात्र आमदार रघुवंशी यांच्या याच वैशिष्ट्याचा त्रास होत आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.