Chhagan Bhujbal : ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या आस्मानी संकटात शासन शेतकऱ्यांच्या सोबत असून सर्वतोपरी मदतीसाठी सदैव कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार मागे हटणार नाही असे सांगत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
आज येवला व निफाड तालुक्यातील परतीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपीकांच्या नुकसानीची पाहणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री भुजबळ म्हणाले की, परतीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मका, सोयाबीन, कांदा, द्राक्षबागा, भुईमुग, टोमॅटो, भाजीपाला यासह विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
झालेल्या नुकसानीचे मोहीम स्तरावर पंचनामे करण्यात यावेत. यात एकही बाधित शेतकरी वंचित राहता कामा नये. या कामी ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही तेथील अधिकाऱ्यांची मदत घेण्यात यावी, अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची घोषणा केली आहे. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्यात येत आहे. बाधित शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपाची मदत सुरू करण्यात आली असून प्रत्येकी १० किलो तांदूळ आणि १० किलो गहू अशा स्वरूपात अन्नधान्याचे वाटप सुरू करण्यात आल्याचे भुजबळांनी सांगितले.
आवश्यक त्या ठिकाणी आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय सेवा देखील पुरविण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी. मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना अश्वासित केले. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. ‘बळीराजाने धीर धरावा, खचून जाऊ नये’ अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी बाधित शेतकऱ्यांना धीर दिला.
येवला तालुक्यातील गवंडगाव, रस्ते सुरेगाव, पिंपळखुटे खुर्द, डोंगरगाव आणि निफाड तालुक्यातील कोटमगाव व वनसगाव येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पीकांची पाहणी मंत्री भुजबळ यांनी केली. यावेळी प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडी, येवला तहसीलदार पंकज नेवसे, कृषी अधिकारी शुभम बेरड, सुधाकर पवार, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, गटविकास अधिकारी नम्रता जगताप,मंडळ अधिकारी रूपाली साळवे, ग्राम महसूल अधिकारी भारत नागरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.