Maharashtra politics : सध्या राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावरुन राष्ट्रवादीचे नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे सरकारची कोंडी झाली आहे. भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीतही आपली नाराजी बोलून दाखवली. तर नाशिकच्या पालकमंत्री पदावरुन देखील भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन व भुजबळांमध्ये धुसफूस आहे. परंतु असे असतानाही या सगळ्यात भुजबळांची भाजप नेत्यांसोबत जवळीक वाढत असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.
या चर्चांना उधाण येण्याचं कारण म्हणजे नाशिकमधील 'सीपीआरआय' टेस्टिंग लॅब उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन व मंत्री छगन भुजबळ यांनी काल एकाच विमानाने प्रवास केला. तसेच विमानतळापासून शिलापूरच्या उद्घाटन स्थळापर्यंत या नेत्यांनी गाडीतून सोबतच प्रवास केला. कार्यक्रमस्थळी तिघेही एकाच व्यासपीठावर एकमेकांच्या बाजुला बसले. यावेळी त्यांनी एकमेकांशी कानात साधलेला संवाद उपस्थितांच्या नजरेआड झाला नाही.
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मुंबईत आंदोलन पुकारलं. त्यानंतर सरकारने जरांगेच्या आठ पैकी सहा मागण्या पूर्ण केल्या. थेट जीआरच काढला. त्यावरून ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण झालेला असताना मंत्री भुजबळ यांनी थेट शासनाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे सरकारची देखील कोंडी झाल्याने भुजबळांची मनधरणी करण्यासाठी 'संकटमोचक' गिरीश यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना सोबत घेण्याची खेळी खेळल्याचे दिसते.
भुजबळांच्या मनधरणीचे प्रयत्न सरकारकडून सुरु आहेत. त्यातच शिलापूरच्या इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग लॅबच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भुजबळ व भाजप नेत्यांची जवळीक अधिक वाढली आहे. केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याबरोबर भुजबळांनी प्रवासही केला. तेव्हा सुरक्षारक्षकास गाडीतून उतरून दुसऱ्या गाडीत बसविण्यात आले. त्यामुळे या दोघांमध्ये राजकीय गुप्तगू झाल्याची शक्यता वर्तविली जाते. या सगळ्या घडामोडी पाहाता दिवसेंदिवस भुजबळांची भाजपशी जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरु झाल्या आहेत.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा तिढा मोठ्या प्रयत्नांनी सरकारने सोडवला आहे. मात्र भुजबळांनी न्यायालयात जाण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे त्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आता भाजप नेत्यांकडून भुजबळांना सोबत घेऊन त्यांची मनधरणी करण्यात येत असल्याचं दिसतं. यात मुख्यत: मुख्यमंत्री फडणवीस व संकटमोचक महाजन यांना कितपत यश येतं हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.