Bhujbal Vs Godse Politics: लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने सर्वच पक्षाने तयारी सुरू केली आहे. नाशिकची जागा महायुतीमध्ये कॊणाच्या वाट्याला जाणार हे ठरलेले नाही. त्यापूर्वीच वातावरण चांगलेच तापले आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार हेमंत गोडसे यांचे नाव न घेता टीका केली. भुजबळ यांचा २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्या पराभवाची सल अद्यापही त्यांच्या मनात आहे, असे त्यांच्या भाषणातून जाणवले.
येथील डॉ. कैलास कमोद यांच्या 'फुलला माळ्याचा मळा' या पुस्तकाचे भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ यांनी २०१४ मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यांची लढत शिवसेना भाजप युतीचे हेमंत गोडसे यांच्याशी होती. (Chhagan Bhujbal News)
मावळते खासदार समीर भुजबळ यांच्या ऐवजी भुजबळ स्वतः उमेदवार होते. समीर भुजबळ यांच्या कारकिर्दीत नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर विकास झाला, असा त्यांचा दावा होता. या बळावरच त्यांनी उमेदवारी घेतली होती. अशी त्यांच्या उमेदवारीला पार्श्वभूमी होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. या पराभवाची सल अद्यापही त्यांच्या मनात आहे, असे त्यांच्या वक्तव्यावरून जाणवले.
या संदर्भात भुजबळ यांनी महायुतीचे उमेदवार खासदार गोडसे (Hemnat Godse) यांचे नाव न घेता खंत व्यक्त केली. ते म्हणाले, नाशिकमध्ये मी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत जातीवर आधारित मतदान झाले. विकासकामे करूनही जातीच्या आधारे मतदान झाल्याने माझा पराभव झाला. कर्तृत्व नसलेल्या व्यक्तीच जातीच्या आधारे मते मागतात, असा चिमटादेखील त्यांनी या वेळी घेतला.
या कार्यक्रमात भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मी ओबीसी घटकांच्या आरक्षण कायम राहावे, यासाठी पाठपुरावा करीत आलो आहे. मात्र, त्याचा मला त्रासच झाला अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात माळी समाजाने पुढे आले पाहिजे. इतरांनी राजकारण करायचे आणि आपण फक्त बघत राहायचे हे बरोबर नाही. देशात आठ ते नऊ टक्के माळी समाज आहे. मात्र, त्या प्रमाणात विविध क्षेत्रात त्यांना प्रतिनिधित्व मिळालेले नाही. धाडस केल्याशिवाय काहीच मिळत नाही. त्यामुळे माळी समाजाने पुढे यावे पोट जाती नष्ट कराव्यात.
R