Chhagan Bhujbal vs Girish Mahajan dispute Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : नाशिक शहर वाऱ्यावर सोडलंय का? भुजबळ कुंभमेळा मंत्र्यांपासून आयुक्तांपर्यंत सगळ्यांवर संतापले, फडणवीसांसमोर मांडणार मुद्दा

Chhagan Bhujbal, Nashik potholes : नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांवर आणि मृत्यूच्या घटनांवर मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाढत्या खड्ड्यांमुळे अपघात वाढले असून पाच जणांचा बळी गेला आहे. शहरातील खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांवर आणि मृत्यूच्या घटनांवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारला घरचा आहेर दिला आहे. कुंभमेळा मंत्र्यानी नाशिककडे लक्ष द्यावं असं भुजबळांनी म्हटलं आहे.

भुजबळांनी नाशिकमधील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था, कुंभमेळ्याच्या कामांतील नियोजनाचा अभाव आणि महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. कुंभमेळ्याच्या कामांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात येता कामा नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडत हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडणार असल्याचे स्पष्ट केले.

खड्डे पुन्हा पुन्हा भरावे लागत असतील तरी भरले पाहीजे. लोकांचा जीव महत्वाचा आहे. भुजबळ यांनी कोतकर यांच्यासह आतापर्यंत पाच जणांचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्याचे नमूद केले. महापालिका शासनाच्या हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाल्याचे खडेबोल भुजबळांनी सुनावले. तातडीने रस्ते बुजविले पाहिजेत. कुंभमेळ्यासाठी रस्ते खोदले असतील तर पर्यायी रस्त्यांची योग्य व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कुणीतरी याची जबादारी घेतली पाहीजे. कुंभमेळा आयुक्त प्रवीण गेडाम यांनी आपल्या अधिकारांचा वापर केला पाहीजे. उत्कृष्ट अधिकारी म्हणून गेडाम यांचे नाव आहे. त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन नाशिकच्या रस्त्यांवर उतरलं पाहीजे. काय चालू आहे ते बघितलं पाहिजे. नाशिकचं नाव खराब करण्याचं काम सुरु आहे. यापूर्वी नाशिकची अशी अवस्था कधीही झाली नव्हती असं भुजबळांनी सुनावलं.

खड्ड्यांनी निष्पाप लोकांचे मृत्यू होत आहेत. कुंभमेळा मंत्र्यांनी व गेडाम साहेबांनी यात लक्ष घातलं पाहीजे. अधिकारी काम करत नसतील तर कारवाई केली पाहीजे. मनपा आयुक्त प्राधिकरणावर जबाबदारी ढकलत असल्याच्या मुद्द्यावर भुजबळ म्हणाले, मनपा आयुक्तांनी लक्ष दिले पाहिजे, जबाबदारी घेतली पाहीजे. एक वीट जरी इकडची तिकडे करायची असली तरी महापालिकेची परवानगी लागते. महापालिका आयुक्तांनी जबाबदारी झटकून चालणार नाही.

प्रत्येक गोष्टीची जबाबदारी महापालिकेची असते. त्यांना वाटत असेल हे कुंभमेळा प्राधिकरणाचे काम आहे तर त्यांनी त्यांना बोलवून घेतलं पाहीजे, माझं काम नाही त्याचं काम आहे असं सांगून चालणार नाही. महापालिका आयुक्तांना जबाबदारी घ्यावीच लागेल असं भुजबळांनी सुनावलं. शहर वाऱ्यावर सोडले आहे का? असा संतप्त सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.

लोक मरत आहेत, थोडी तरी माणुसकी दाखविली पाहिजे. कुटुंबाप्रती संवेदना दाखवली पाहिजे. लोकांच्या असंतोषाची वाट कोणीही पाहू नये. यात सर्व आले, अगदी कुंभमेळा मंत्री, आयुक्त, महापौर-उपमहापौर असे म्हणत त्यांनी यंत्रणेला सावध करणारा सूचक इशारा दिला.

महापालिका आणि कुंभमेळा प्राधिकरण यांच्यात जबाबदारी ढकलण्याचा प्रकार थांबला पाहिजे. या दुर्घटनांना नेमके कोण जबाबदार आहे, हे स्पष्ट होणे गरजेचे असून तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश दिले जावेत, अशी मागणी त्यांनी केली.

महापौरांपेक्षा आयुक्त आणि प्राधिकरणांकडे अधिक अधिकार असल्याने त्यांनी निर्णयक्षम भूमिका घ्यावी. महापालिका आणि प्राधिकरण यांच्यात समन्वय साधणे हेही महापालिकेचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT