Chhagan Bhujbal : साधरण दोन वर्ष छगन भुजबळ हे तुरुंगात होते. कारागृहातून बाहेर आल्यानंतर भुजबळ पुन्हा मंत्री झाले. आताही महायुतीच्या मंत्रिमंडळात भुजबळ मंत्री झाले आहेत. पण ज्यांनी तुमची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली. तुमच्यावर आरोप केले. तुम्हाला तुरुंगात टाकलं. तेच लोक तुम्हाला मंत्रिमंडळात घेण्यासाठी आग्रही होते. त्यांच्या सोबतच तुम्ही मांडीला मांडी लावून बसला आहात. एक राजकारणी म्हणून अशा लोकांच्या बाजूला जावून बसताना कसं वाटतं याबाबत विचारणा केली असता भुजबळांनी त्यावर उत्तर दिलं आहे.
छगन भुजबळ हे साम टिव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ते म्हणाले, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. मी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मंत्री आहे. आम्ही त्याच्यांसोबत युती मध्ये आहोत. पूर्वी कॉंग्रेस व शिवसेना पण विरोधात आम्ही होतोच. त्यावेळेला सुद्धा उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही दोन वर्ष बसतच होतो. मग त्यावेळेला जर चाललं तर आता का नाही चालत असा प्रतिसवाल भुजबळांनी केला.
भुजबळ म्हणाले, हे आमच्या नशिबात अनेक वेळा येतं. तेलगी प्रकरण विरोधी पक्षांनी प्रचंड गाजवलं होतं. मला पवार साहेबांनी त्यावेळी तत्काळ राजीनामा दे म्हणून सांगितलं...मी अर्धा तासात जावून राजीनामा देऊन टाकला. त्यावेळेला माझ्याकडे उपमुख्यमंत्री पद, गृहमंत्री पद होतं तरीही राजीनामा दिला.
त्यानंतर सीबीआयने त्याप्रकरणी चौकशी केली. भुजबळ हे नाव शार्टशीट मध्ये आलंच नाही. ज्यावेळी माझा त्या प्रकरणाशी संबंध नाही हे सिद्ध झालं. त्यानंतर साहेबांनी परत मंत्रिमंडळात घेतलं. हे चढ-उतार राजकीय जीवनात येत असतात. पवार साहेबांनीच राजीनामा द्यायला सांगितला होता त्यांनीच परत घेतलं. त्यानीच परत २०१९ मध्ये मला शिवाजी पार्कला बसवलं. राजकारणात कधीकधी अशा गोष्टी घडतात. त्या जर धरुन बसलो तर मग आपल्याला घरातच बसावं लागेल असं भुजबळ म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. ओबीसी चेहऱ्याची गरज आहे, म्हणून तुम्हाला मंत्रिमंडळात घेतलं का? यावर बोलताना भुजबळ म्हणाले, मग बाळासाहेबांनी मला आमदारकी सोबत दोनवेळा महापौर पद कशासाठी दिलं होतं. त्यावेळी ओबीसीचा मुद्दा होता का तर नाही. कॉंग्रेसमधून आल्याबरोबर दहा दिवसांत मला कॅबिनेट मंत्री केलं गेलं, त्यावेळी ओबीसी मुद्दा होता का तर नाही. 95 साली जेष्ठ लोक पक्षात असताना मला पवार साहेबांनी विरोधी पक्ष नेता केलं, सीडब्लूसी चा कॉंग्रेस वर्किंग कमिटीचा मेंबर केलं त्यावेळी काय मुद्दा होता. त्याच्यानंतर सुद्दा ज्यावेळेला आमचं राष्ट्रवादीचं सरकार आलं त्यावेळी मोठ्यात मोठं पद मला दिलं. पुढे सुद्दा २००४, २००९, २०१९ मध्ये काय मुद्दा होता.
मी 35 वर्ष काम करत आहे. ही लढाई एवढ्या-एक दोन वर्षातच चुकीच्या पद्धतीने उठवली गेल्याचे भुजबळ म्हणाले. त्यावेळी सुद्धा भुजबळांमध्ये काहीतरी स्पार्क असेल की फक्त जात होती, की फक्त ओबीसी समाज होता तर नाही. पक्षासाठी झटून काम करत होतो म्हणून पदं मिळाल्याचे भुजबळ म्हणाले.
ओबीसीसाठी लढलो तो माझा स्वभाव आहे. ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला दिलं जाणं शक्यच नाही. त्याचं कारण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा मुद्दा चार आयोगांनी फेटाळला. सुप्रीम कोर्टानेही फेटाळलं. त्यामुळे ते शक्यच नाही. त्यामुळे तर वेगळं आरक्षण दिलं असं भुजबळ म्हणाले. कॉंग्रेस-राष्ट्रवादी मध्ये असताना सुद्धा आम्ही ते दिलं होतं. फडणवीस सरकार मध्येही दिलं. प्रत्येकवेळेला मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या म्हणून मी हात वर केला पण ओबीसीतून नको असं भुजबळ म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.