Medical Corruption
Medical Corruption Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Corruption: एका बिलाला ३० हजार तर वर्षभरात कितीचा घोटाळा?

Sampat Devgire

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील (Nashik civil Hospital)बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र (Bogus medical Certificate) प्रकरण राज्यभर गाजत असतानाच, वैद्यकीय बिलापोटी २४ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाच्या पथकाने सोमवारी अटक केली. राजेश सुधाकर नेहुलकर असे या लाचखोर लिपिकाचे नाव असून, त्यास न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या घटनेने वैद्यकीय बिल मंजुरीसाठी चर्चेत असलेल्या साखळीप्रकरणाला पुष्टी मिळाली आहे. (ACB trapped a cleark of civil hospital for Deemanding bribe)

यानिमित्ताने वैद्यकीय बिले मंजुरीसाठी पाच टक्के कमिशन घेतले जाते असे तक्रारीत म्हटले आहे. जिल्हा रुग्णालयाकडून दरवर्षी कोट्यावधींची बिले मंजुर केली जातात. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती किती असेल याची चर्चा आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराने त्याच्या पत्नीच्या आजारपणाचे दोन वैद्यकीय बिलं मंजुरीसाठी जिल्हा रुग्णालयात दिली होती. ही बिले मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात लाचखोर नेहुलकर याने १० ऑगस्ट २०२२ ला बिलांच्या रकमेच्या पाच टक्के याप्रमाणे ३० हजारांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराने तडजोड करून २४ हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. मात्र त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. नेहुलकर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारीची माहिती मिळाल्याने तो रजा टाकून लाचेची रक्कम घेण्यास टाळाटाळ करीत होता. अखेर दोन महिन्यांनंतर विभागाने नेहुलकरविरोधात लाचेची मागणी केल्याबद्दल गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

नेहुलकर यास सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यास एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तक्रारदाराने नेहुलकर याची तक्रार रुग्णालयातील वरिष्ठांकडेही केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई केली नाही, अखेर तक्रारदाराने मुंबईत तक्रार केल्यानंतर नेहुलकरविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केल्याची जिल्हा रुग्णालयात परिसरात चर्चा आहे. सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

दुसऱ्यांदा कारवाई

तक्रारदाराने नेहुलकर याने लाच मागतानाचे चित्रीकरण केले आहे. त्यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रारही करण्यात आली होती. त्यामुळेच नेहुलकर वैद्यकीय रजेवर गेला होता. गेल्याच आठवड्यातच तो रुजू झाला आणि सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत असतानाही नेहुलकर यास लाच घेताना पकडले होते. त्यानंतर कारवाई म्हणून त्याची वेतनकपात करून नाशिक जिल्ह्यात बदली केल्याचे समजते.

साखळीशी वरिष्ठांचेही संबंध

शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बिले देण्याच्या मोबदल्यात पाच ते दहा टक्के लाचेची मागणी केली जाते. जिल्हा रुग्णालयात अशी वैद्यकीय बिले मंजूर करून देणारी लाचखोरांची मोठी साखळी कार्यरत आहे. लाच घेतल्याशिवाय अशी बिलं मंजूर केली जात नाहीत. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्या आहेत. मात्र वरिष्ठांचेही या साखळीशी हितसंबंध जोडलेले असल्याने याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. आजच्या या कारवाईमुळे वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी मोठी साखळी असल्याचेच सिद्ध झाले आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT