Kailas Jadhav, Commissioner Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

कैलास जाधवांनी नगरसेवकांना खडसावले, अन्यथा निवडणुकीला बंदी करीन!

महापालिकेकडून कोरोना काळात वितरीत केलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जमा करण्याची मोहीम सुरु आहे.

Sampat Devgire

नाशिक : महापालिकेच्या खर्चातून पडून असलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर परत मागविण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु, एकाही नगरसेवकाकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जमा झाले नाही. त्यामुळे निवडणुकीत उभे राहण्यासाठी प्राप्त करावयाच्या ना हरकत दाखल्यात नोंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना दुसऱ्या लाटेने मार्च- एप्रिल व मे महिन्यात हाहाकार माजविला. या कालावधीत मागील वर्षाचे सर्व विक्रम मोडीत निघाले. या अडीच महिन्यात एक लाखांहून अधिक रुग्ण आढळून आल्याने ऑक्सिजनची मोठी टंचाई निर्माण झाली. मार्च महिन्यातच महापालिकेने बिटको व झाकिर हुसेन रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन टाक्या बसविल्यामुळे गैरसोय झाली नाही. परंतु, ऑक्सिजन अभावी अनेक खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करून घेतले गेले नाही. ऑक्सिजन टंचाई काळातच तत्काळ ऑक्सिजन उपलब्ध करून देणारा पर्याय म्हणून कॉन्सन्ट्रेटर समोर आले.

आयुक्त जाधव यांनी ऑक्सिजन टंचाई व भविष्यात तिसरी कोरोना लाट येईल, हे गृहीत धरून तत्काळ कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. नगरसेवकांनीदेखील प्रभाग विकास निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी देण्याची तयारी दाखविली. त्यानुसार महापालिकेने तब्बल १२०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेत कोरियन कंपनीला यंत्रांची ऑर्डर दिली. त्यानुसार महापालिकेकडे कॉन्सन्ट्रेटर प्राप्त झाले.

नगरसेवकांकडे यंत्रे सुपूर्द करताना गहाळ होऊ नये म्हणून वर्षनिहाय क्रमांक देण्यात आले. कोणत्या नगरसेवकाला, तसेच कोणत्या अधिकाऱ्याला यंत्रे ताब्यात दिली याची नोंद ठेवण्यात आली. दुसरी लाट ओसरल्यानंतर नगरसेवकांनी महापालिकेची मालमत्ता म्हणून यंत्रे परत करणे अपेक्षित होते. परंतु, आयुक्तांनी वैद्यकीय विभागाला सूचना देवून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुन्हा मागविण्याच्या सूचनादेखील दिल्या. त्यानुसार नगरसेवकांकडे कॉन्सन्ट्रेटर मागविले, परंतु एकाही नगरसेवकाकडून जमा झाले नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ना हरकत दाखला न देण्याचा निर्णय घेतला आहे.

ना हरकत दाखला...

पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीला उभे राहणाऱ्या इच्छुकांची महापालिकेकडे कुठल्याही प्रकारची म्हणजे घर व पाणीपट्टी व अन्य कर थकीत नसावे. निवडणूक अर्ज दाखल करताना त्यानुसार ना हरकत दाखला महापालिकेकडून प्राप्त करून घ्यावा लागतो. त्यामुळे आता नगरसेवकांना ना हरकत दाखला घेताना कॉन्सन्ट्रेटर वैद्यकीय विभागाकडे जमा केल्याचादेखील ना हरकत दाखला प्राप्त करून घ्यावा लागणार आहे.

---

कोरोनाकाळात रुग्ण सेवेसाठी नगरसेवकांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर महापालिकेची मालमत्ता असल्याने जमा करणे आवश्‍यक आहे. गरज पडल्यास पुन्हा वापरासाठी देता येतील. त्यामुळे नगरसेवकांनी जमा करावे.

- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT