Legal challenge to Amol Khatal MLA position: एकनाथ शिंदे यांच्या शिलेदार न्यायालयीन फेऱ्याच्या कचाट्यात अडकला आहे. काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दाखल केलेली निवडणूक याचिक फेटाळण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात थोरातांनी याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती किशोर संत यांचे खंडपीठासमोर सुनावणी घेणार आहेत.
बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी, अमोल खताळ यांच्या निवडणुकीला, आव्हान दिले आहे. त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाचा स्रोत आणि कर थकबाकी जाहीर केली नाही, असे याचिकेत म्हटलं आहे. थोरातांच्या निवडणूक याचिकेवर आता सात मे रोजी सुनावणी होईल.
महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर अनेक निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. विजयी उमेदवारांनी त्या फेटाळण्याची मागणी केली होती. त्यानुसार बहुतांश याचिका रद्द करण्यात आल्या होत्या.
पण एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) आमदार अमोल खताळांविरोधातील दाखल याचिकेत उत्पन्नाचा स्त्रोत लपवण्यावरून, अन् थोरातांनी थेट सरकारी वेबसाईटचा आधार घेत, डिजिटल पुरावा दिल्यानं न्यायालयाने स्वीकारली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी याचिकेत म्हटलं आहे की, अमोल खताळ हे 'नीलकमल' नावाच्या फर्ममध्ये भागीदार आहेत. हे सांगण्यासाठी त्यांनी जीएसटी विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या नोंदींचा आधार याचिकेत दिला आहे. यानुसार त्या फर्मवर व्यावसायिक कराची थकबाकी होती.
असे असूनही, अमोल खताळ यांनी कथितरित्या फर्मसोबतचा आपला संबंध उघड केला नाही. फॉर्म 26 मध्ये, त्यांनी सरकारी देयकांखाली 'शून्य' असे घोषित केले होते. थोरात यांनी दावा केला की, ही थकबाकी 25000 रुपये असून, त्यावर 26650 रुपये व्याज मिळून एकूण रक्कम 54650 रुपये होते.
असे असतानाही आमदार खताळ यांनी त्यांचे उत्पन्नाचा स्त्रोत लपवला. वकील आर. एम. धोर्डे आणि अमित करांडे यांच्यामार्फत थोरात यांनी यांनी याचिका दाखल करत, आमदार खताळ यांचा विजय लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 100(1)(B), 100(1)(D)(i) आणि 100(1)(D)(iv) अंतर्गत अवैध घोषित करण्याची मागणी केली आहे. तसेच, कायद्याच्या कलम 101(B) अंतर्गत स्वतःला रीतसर निवडून आलेले घोषित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, आमदार खताळ यांनी थोरातांची याचिका फेटाळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाली. खताळ यांनी अर्जाद्वारे, आता फर्ममध्ये भागीदार नाहीत आणि नीलकमल फर्म विसर्जित झाली आहे, असा युक्तिवाद केला. परंतु थोरात यांनी फर्मची स्थिती सक्रिय असल्याचे दर्शवणारे जीएसटी वेबसाइटवरील दस्तऐवज न्यायालयासमोर आणले.
थोरातांनी सादर केलेल्या जीएसटी वेबसाइटवरील दस्ताची औरंगाबाद खंडपीठाने गंभीर दखल घेत निरीक्षण नोंदवले की, या टप्प्यावर, खताळ यांचा हा बचावाचा विचार या टप्प्यावर केला जाऊ शकत नाही. तसंच न्यायालयाला, यामध्ये लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 100(1)(B)चे घटक स्पष्टपणे लागू होतात, असे निरीक्षण नोंदवलं आहे.
काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे दिग्गज नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना विधानसभा निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघातून पराभवाचा धक्का बसला. चार दशकांपासून ते विधानसभेचे प्रतिनिधीत्व करत होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे अमोल खताळ यांनी त्यांचा पराभव केला.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून अमोल खताळ यांनी आघाडी उघडली होती. ते शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. अमोल खताळ यांना 1 लाख 11 हजार 495 मते मिळाली, तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना 99 हजार 643 मते मिळाली. दहा हजारांच्या मतांनी थोरातांचा पराभव झालेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.