Arun Gujarathi-Eknath Khadse-Congress
Arun Gujarathi-Eknath Khadse-Congress Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

काँग्रेसचा चोपडाच्या जागेवरून राष्ट्रवादीला इशारा : अरुण गुजराथी, एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला!

कैलास शिंदे

जळगाव : जळगाव जिल्हा बॅंकेत भारतीय जनता पक्षाला वगळून आता तीन पक्षाची महाविकास आघाडी झाली आहे. मात्र, त्यात आता चोपडा सोसायटी मतदार संघाच्या जागेवरून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच जोरदार घमासान सुरू झाले आहे. महविकास आघाडीत बिघाडी करू नका, अशी तंबीच कॉंग्रेसने राष्ट्रवादीला दिली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, अरूण गुजराथी, आणि कॉंग्रसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार उल्हास पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, त्यामुळे ही जागा कुणाला सुटणार की या जागेवरून महाविकास आघाडी फिस्कटणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (Congress's warning to NCP from Jalgaon District Bank's Chopda seat)

जळगाव जिल्हा बॅंकेच्या संचालक निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना अशी तीन पक्षाची महाविकास आघाडी स्थापन झाली आहे. त्यांच्यात अद्याप जागावाटप झालेले नाही. पण, चोपडा विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून दोन्ही पक्षांत वाद सुरू झाले आहेत. या मतदार संघात कॉंग्रेसचे डॉ. सुरेश पाटील हे विद्यमान संचालक आहेत. कॉंग्रेसतर्फे त्यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ही जागा घनश्‍याम अग्रवाल यांच्यासाठी सोडावी, अशी मागणी होत आहे. अग्रवाल हे अगोदर भारतीय जनता पक्षात होते. मात्र, नुकताच त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी अग्रवाल यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला आहे, याबाबत त्यांनी जाहीर घोषणाही केली आहे. अग्रवाल हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या निकटचे असल्याचेही सांगण्यात येत आहे, त्यामुळे खडसे यांचाही त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह आहे.

कॉंग्रेसने उमेदवार सुरेश पाटील यांच्यासाठी मेळावा घेतला आहे. त्यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, आमदार शिरीष चौधरी आदी उपस्थित होते. या मेळाव्यात त्यांनी थेट इशाराच दिला आहे की, चोपडा मतदारसंघाची जागा कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुरेश पाटील यांनाच देण्यात यावी; अन्यथा महाविकास आघाडीत बिघाडी होऊ शकते. आम्ही समोरासमोर लढायला तयार असल्याचेही कॉंग्रेस नेत्यांनी या मेळाव्यात जाहीर केले आहे.

कॉंग्रेसच्या नेत्यांनी दंड थोपटल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र जर योग्य तोडगा निघाला नाही, तर जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत या जागेवरून महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॉंग्रेस विरूध्द राष्ट्रवादी आणि शिवसेना असा सामना होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT