Covid vaccination to dead person Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

१०० कोटींच्या टार्गेटसाठी मृत व्यक्तींनाही कोरोनाचा दुसरा डोस?

Sampat Devgire

दोंडाईचा : भारताने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केल्याचा जल्लोष देशभर सुरू असताना या जल्लोषाला डाग लागला आहे, तो धुळे जिल्ह्यातील मालपूर गावात. ६ एप्रिलला मृत झालेल्या व्यक्तीला १९ ऑक्टोबरला दुसरा डोस दिल्याचे प्रमाणपत्र संबंधित यंत्रणेने पाठवून आपण कशाचा जल्लोष व अभिनंदन करीत आहोत, याचा प्रत्यय दिला.

दरम्यान असाच एक प्रकार गुजरात येथेही घडल्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ५५ वर्षाच्या करंजीया दरदास यांना ३ मे २०२१ या दिवशी सुरजवाडी (राजकोट) केंद्रात पहिला डोस काजलबेन यांनी दिल्याचे रेकॅार्ड उपलब्ध झाले आहे. मात्र त्यांचा २० ऑगष्ट २०१८ रोजीच निधन झालेले आहेत. तीन वर्षांपूर्वी निधन झालेल्या व्यक्तीला डोस कसा दिला? असा प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हीडिओमध्ये विचारला जात आहे. या व्हिडिओची सत्यता अद्याप सिद्ध झालेली नाही, मात्र एका वाहिनीवर त्याची बातमी दाखवली गेली.

मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बन्सीलाल सुका धनराळे (वय ६६) यांनी १० मार्चला कोव्हिशील्ड या लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यांचा ६ एप्रिलला मृत्यू झाला. त्या घटनेला तब्बल सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला गेला. परंतु बन्सीलाल धनराळे यांच्या मोबाईलवर अचानक १९ ऑक्टोबरला कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला असल्याचा मेसेज आला. कुटुंबाने मेसेज आल्याची लिंक ओपन केली असता दुसरा डोस घेतला असल्याचे प्रमाणपत्र पाठविण्यात आले असल्याचे दिसून आले.

हा प्रकार बघून कुटुंब अचंबित झाले त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क केला. मात्र कुणीही उत्तर देऊ शकले नाही. देशात शंभर कोटी डोस पूर्ण केल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात असताना ही घटना समोर आली आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तींनाही आरोग्य विभाग कोरोनाचे लसीकरण करत असल्याने असे किती जणांची डोस दिल्याची नोंद केली गेली आहे, याचा शोध संबंधित विभागाने घ्यावा, अशी मागणीच (कै.) धनराळे यांचा मुलगा विनोद धनराळे यांनी केली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT