Agricultural Minister Dada Bhuse

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

धर्मगुरूंच्या उपस्थितीत मालेगावात कोरोना सेवकांचा झाला सन्मान!

मालेगाव येथे कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोना सेवकांचा सत्कार संपन्न.

Sampat Devgire

मालेगाव : कोरोना महामारीच्या सुरवातीला अनेक लोकांना या आजाराने बाधीत केले. यामुळे अनेकांचे उद्योग, व्यवसाय, काम बंद पडून मोठ्या कालावधीसाठी लॉकडाऊनचा सामना करावा लागला. या संकटकाळात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कोरोना सेवकांचे काम निश्‍चितच कौतुकास्पद आहे. त्यांचा सन्मान करून या कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढविण्याची जबाबदारी सर्व मालेगावकरांची असल्याची भावना कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी व्यक्त केली.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मालेगाव शहर व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने येथील पोलिस कवायत मैदानावर कोरोना सेवकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी श्री. भुसे बोलत होते.

कार्यक्रमास उपमहापौर नीलेश आहेर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, रामा मिस्तरी, संजय दुसाने यांच्यासह सर्वधर्माचे धर्मगुरु उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले, की कोरोना संकटकाळात आपल्यातील चांगले लोक आपल्याला सोडून गेले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्ञात, अज्ञात अनेकांनी या आजाराचा सामना केला. आपापल्या परिने रुग्णांची सेवा करण्याची जबाबदारी पार पाडली. जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करीत आहोत. कोरोना अजूनही संपलेला नाही. कोरोनाच्या नवीन विषाणूचे संकट संपूर्ण देशावर घोंघावत असल्याने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रातील संस्था व महानुभावांनी अतिशय समर्पित भावनेने रुग्णांची सेवा केली. त्या रुग्णसेवेला मालेगावकरांच्या वतीने आभार व ऋण व्यक्त करण्यासाठी कोरोना सेवकांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी सर्व धर्मगुरूंच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी पोलिस महानिरीक्षक शेखर म्हणाले, की अनेकांचे सत्कार पाहिले आहेत. परंतु, तळागाळातील कोरोना सेवकांचा अमृत महोत्सवीवर्षी करण्यात येणारा सत्कार हा सामाजिक एकोपा आणि एकात्मतेचा संदेश देणारा सोहळा आहे. या सेवकांच्या कार्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केल्यास कोरोनाचे समुळ उच्चाटन होऊ शकेल.

या वेळी शहर व तालुक्यातील सर्व डॉक्टर, संस्थाचे पदाधिकारी, समाजसेवक, कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणारे सर्व क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, महिला व नागरिक यांचा गौरव करण्यात आला.

एकोप्यातून संकटावर मात

मालेगाव पॅटर्नमुळे एक यशोगाथा तयार झाली आहे. जिल्हाधिकारी या नात्याने मलाही मालेगाव पॅटर्नबद्दल विचारणा होते. त्यावेळी मी एकच सांगत असतो, पोटतिडकीने काम करणारे कर्मचारी, त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी आणि त्यांच्या कर्तृत्वावर कौतुकाची थाप देणारे लोकप्रतिनिधी हे संयोजन एकत्र आल्यावर कुठल्याही सामाजिक संकटावर मात करणे सहज शक्य होते, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT