Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse: दादा भुसे यांनी राखली ५४ वर्षांची लाल दिव्याची परंपरा!

दादा भुसेंना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने राज्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी मालेगावचे स्थान कायम.

Sampat Devgire

मालेगाव : राज्य मंत्रिमंडळाच्या (Maharashtra) विस्तारात अपेक्षेप्रमाणे मालेगाव (Malegaon) बाह्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादा भुसे (Dada Bhuse) यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली. नाशिक (Nashik) जिल्ह्यातून ते एकमेव मंत्री आहेत. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून या शहराला ७-८ वर्षांचा अपवाद वगळता मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे ५४ वर्षांची ही परंपरा कायम राहिली आहे. (Malegaon`s representitive allways keep seat in Maharashtra ministry)

आता नाशिकचे पालकमंत्रीपद कोणाला याविषयी उत्सुकता आहे. श्री. भुसे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळताच शहर, तालुक्यातील समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून जल्लोष केला.

शहरातील मोसमपूल चौक, संपर्क कार्यालयाजवळ फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कॅबिनेट मंत्रिपदामुळे जिल्ह्यातील सत्ता केंद्रस्थानी मालेगावचे वर्चस्व कायम राहिले आहे. राज्यनिर्मितीपासून सात ते आठ वर्षांच्या कार्यकाळ वगळता मालेगावचा ‘लाल दिवा’ कायम आहे. यामुळे जिल्हानिर्मितीसह विकासकामांसंदर्भात आशा पल्लवीत झाल्या आहेत.

श्री. भुसे यांचा शपथविधी होताच सोयगाव नववसाहत, मोसमपूल चौकासह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी मिरवणुका काढून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदींचा जयघोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. धर्मवीर आनंद दिघे यांना मुख्यमंत्री शिंदे व श्री. भुसे आदरस्थानी मानतात. दोघे त्यांच्या समाजकार्याने प्रभावीत झाले आहेत. तेव्हापासूनच मुख्यमंत्र्यांशी श्री. भुसे यांची घनिष्ट मैत्री आहे. श्री. शिंदे यांनी केलेल्या उठावात श्री. भुसे यांनी शांतपणे महत्त्वाची भूमिका बजावली. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर श्री. शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत राज्यव्यापी दौऱ्याला मालेगावपासून सुरवात केली. मुंबई, ठाणे वगळता त्यांची पहिली जाहीर सभा व नागरी सत्कार येथेच झाला. सभेबरोबरच नाशिकऐवजी उत्तर महाराष्ट्राची महसूल विभागाची आढावा बैठक मालेगावला घेत श्री. शिंदे यांनी भुसे यांचे महत्त्व व आगामी काळात मालेगाव केंद्रस्थानी असेल, हे अधोरेखित केले होते. त्याचवेळी भुसे यांची मंत्रिपदी निवड निश्‍चित मानली जात होती. आता त्यांना नाशिकचे पालकमंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा आहे.

आघाडी सरकारच्या टॉपटेन मंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश होता. कृषी मंत्री असताना, कोरोनाच्या बिकट स्थितीतही कृषी विभागाच्या आढावा बैठकीनिमित्त त्यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला होता. यापूर्वी त्यांनी सहकार, ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून व कृषी मंत्री म्हणून अडीच वर्षे उल्लेखनीय काम केले. यामुळे व विश्‍वासू सहकारी असल्याने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पुन्हा टॉपटेनमध्ये त्यांचा समावेश झाला. कृषी मंत्रिपदाची जबाबदारी मिळताच त्यांनी तालुक्यासाठी कृषी विज्ञान संकुल व पाच महाविद्यालये मंजूर करवून घेतले. यासाठी निधीची तरतूद झाली आहे. दोन महाविद्यालये सुरू झाली आहेत. राज्यात एकावेळी पाच महाविद्यालयांना मंजुरी मिळण्याची घटनाही प्रथमच घडली. कृषी विज्ञान संकुलाचे भूमिपूजनही मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौत्यातच पार पडले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT