Bandukaka Bachhav, Dada Bhuse & Advay Hiray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bandu Kaka Bachhav: दादा भुसे आणि बच्छाव यांच्या फारकतीवर शिक्कामोर्तब, अद्वय हिरे संधीचे सोने करणार का?

Bachhav Challenged Bhuse, What Role Hiray Will Take Now: बंडू काका बच्छाव यांनी अखेर मंत्री दादा भुसे यांच्याशी कायमची फारकत घेतल्याचे मंगळवारी झालेल्या मेळाव्याने स्पष्ट झाले.

Sampat Devgire

Malegaon Political News: मालेगावच्या राजकारणाला काल एक महत्त्वाचे वळण मिळाले. बारा बलुतेदार संघटनेचे नेते बंडू काका बच्छाव यांनी आपली भूमिका जाहीर केली. आगामी निवडणुकीत उमेदवारी करण्याची इच्छाही त्यांनी जाहीर केली.

मालेगाव बाह्य मतदार संघाचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी गेली वीस वर्ष प्रस्थापित हिरे कुटुंबाला सत्तेपासून वंचित ठेवण्यात यश मिळवले आहे. त्या दृष्टीने यंदाची विधानसभा निवडणूक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यात एक महत्त्वाचा निर्णय काल झाला.

बारा बलुतेदार संघटनेचे बंडू काका बच्छाव यांनी पालकमंत्री भुसे यांच्याशी कायमची फारकत घेतली. मंत्री भुसे आणि अद्वय हिरे हे दोघेही या मतदारसंघातील परंपरागत राजकीय गट आहेत. या व्यतिरिक्त अनेक लहान मोठे गट शहरात कार्यरत आहेत.

बंडूकाका बच्छाव हे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. गेल्या काही निवडणुकांमध्ये श्री बच्छाव मंत्री भुसे यांना विरोध करतात आणि ऐनवेळी त्यांच्याशी तडजोड करतात. असा एक संदेश गेला आहे. त्यामुळे भुसे आणि हिरे यांचे विरोधक बंडूकाका बच्छाव यांच्यावर सहज विश्वास ठेवायला तयार नसतात. ही साशंकता काल दूर झाली.

बंडूकाका बच्छाव यांनी काल आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला. हा त्यांचा दुसरा मेळावा आहे. या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केली. पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण त्याचे स्वागत करू.

आगामी निवडणूक मंत्री भुसे यांच्या विरोधात उमेदवारी करण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली. या निमित्ताने भुसे आणि बच्छाव येत्या विधानसभा निवडणुकीत एकत्र येणार नाहीत, असा संदेश यातून मिळाला आहे. मंत्री भुसे विरोधकांसाठी ही महत्त्वाची बाब आहे.

या निर्णयानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि भुसे यांचे कट्टर विरोधक अद्वय हिरे यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. यांचे राजकारण स्वकेंद्रित असल्याची टीका केली जाते. संस्थेच्या माध्यमातून त्यांना मानणारा एक मोठा वर्ग तालुक्यात आहे. मात्र जवळपास दोन लाख मते असलेल्या शहरी भागात भुसे यांचे वर्चस्व आहे.

शहरी भागात श्री. बच्छाव भाजपचे सुनील गायकवाड, काँग्रेसचे निखिल पवार, प्रवीण देसले, गुलाब पगारे असा एक विखुरलेला मात्र तळागाळात काम करणारा भुसे विरोधकांचा गट आहे. या गटाला जवळ करण्यात हिरे यांना अद्याप यश आलेले नाही. मंत्री भुसे यांचा निवडणुकीत पराभव करणे यातील कोणाही एकट्याचे काम नाही.

मंत्री भुसे यांचा मतदार संघावरील पगडा विचारात घेता त्यांच्या विरोधकांची एकी झाली तरच त्यांना आव्हान देणे शक्य होणार नाही हे लपून राहिलेले नाही. त्या दृष्टीने अद्वय हिरे पुढाकार घेऊन श्री. बच्छाव यांसह अन्य विरोधकांना एका मंचावर आणण्यात पुढाकार घेतील का? याची सामान्य कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

मालेगाव बाह्य मतदार संघात मंत्री भुसे हे सामान्य कार्यकर्त्यांत जमिनीवर वावरणारे नेते आहेत. हिरे यांचा संस्था आणि अन्य घटकांच्या माध्यमातून मतदारांची संपर्क आहे. भुसे यांचा राजकीय पाया डळमळीत करायचा असेल, तर हिरे यांना पारंपारिक स्व केंद्रीत राजकारण ऐवजी विरोधकांची मोट बांधण्याचे आव्हान असेल. यंदाच्या निवडणुकीत हा वेगळा मार्ग शिवसेनेचे उपनेते हिरे स्वीकारतील का? याची चर्चा सुरू झाली आहे.

बारा बलुतेदार संघटनेचे नेते बच्छाव यांनी मंगळवारी मालेगाव शहरात मेळावा घेऊन केलेल्या घोषणेमुळे हा मतदारसंघ या राजकीय वळणावर पोहोचला आहे. त्यात पालकमंत्री दादा भुसे पाचव्यांदा यशस्वी होतील का? हा निर्णय भूसे विरोधकांच्या कृतीवर ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT