Dada Bhuse & Prashant Hiray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse Politics: नार-पार श्रेय वादात पालकमंत्री दादा भुसे यांनी हिरे यांना अनुल्लेखाने हिणवले?

Sampat Devgire

Bhuse Vs Hiray News: नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्प मंजुरीची घोषणा राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी केली. त्यामुळे गिरणा खोऱ्यात एक नवी राजकीय लढाई सुरू झाली आहे. सत्ताधारी पक्षाने त्याचे पुरेपूर मायलेज घेण्याची संधी सोडली नाही.

केंद्र शासनाने या प्रकल्पाला मंजुरी देण्याचे टाळले होते. हा प्रकल्प स्वीकारता येणार नाही, असे केंद्राने राज्य शासनाला कळवले होते. त्याचे तीव्र राजकीय पडसाद मालेगाव, जळगाव खानदेशातील नागरिकांत उमटले होते. त्यामुळे आता राज्य शासनाने त्यात हस्तक्षेप केला आहे.

दोन दिवसांपूर्वी या प्रकल्पाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिल्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेचा पुरेपूर राजकीय लाभ सत्ताधारी पक्ष म्हणून महायुतीचे नेते घेत आहेत. त्याचीच एक लढाई मालेगाव मतदारसंघातही दिसून आली.

पालकमंत्री दादा भुसे यांनी नार-पार योजनेचा गिरणा खोऱ्यातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे सिंचनाला लाभ होईल. पिण्याच्या पाण्यासह उद्योगालाही चालना देणाऱ्या या प्रकल्पामुळे मालेगावचा मोठा विकास होईल, असा दावा त्यांनी केला.

नार-पार प्रकल्प गिरणा कारखान्याचे माजी अध्यक्ष (कै) टि. आर. पवार यांनी मांडला होता, असे सांगितले. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी या प्रकल्पासाठी प्रयत्न करणारे माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे यांचा उल्लेख टाळला. त्यामुळे हिरे समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

यासंदर्भात मालेगावच्या विविध सामाजिक संस्थांनी देखील या प्रकल्पासाठी दीर्घकाळ पाठपुरावा केला आहे. त्यासाठी आंदोलन देखील केले आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा माजी मंत्री प्रशांत हिरे यांचा देखील आहे.

श्री. हिरे यांनी स्वखर्चाने नारपार प्रकल्पाचे सर्वेक्षण करून घेतले होते. त्याबाबतचा सर्व तपशील आणि नकाशे त्यांनी जलसंपदा विभाग आणि राज्य शासनाला सादर केले होते. गेली वीस वर्ष ते सातत्याने या प्रकल्पाचा पाठपुरावा करीत होते.

श्री. हिरे यांना अनेक स्थानिक नेत्यांची ही साथ होती. नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या मंजुरीमध्ये माजी मंत्री हिरे यांनी केलेले प्रयत्न लक्षणीय मानले जातात. मात्र राजकीय विरोधक म्हणून पालकमंत्री भुसे यांनी अतिशय चतुर राजकीय खेळी खेळली.

या प्रकल्पाचे स्वागत करतानाच मंत्री भुसे यांनी श्री हिरे यांचा मात्र उल्लेख टाळला. वस्तूत: नार-पार गिरणा खोरे नदी जोड प्रकल्पावरून हिरे विरुद्ध भुसे असा संघर्ष देखील झाला होता. त्यामध्ये भुसे यांनी या प्रकल्पाला फारसे महत्त्व दिले नव्हते, अशी टीका हिरे समर्थक करतात.

आता मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. त्यामुळे त्याचे श्रेय शिवसेना शिंदे गटाला जाते. त्या संधीचा राजकीय लाभ पालकमंत्री भुसे यांनी घेतला आहे. मात्र या निमित्ताने माजी मंत्री हिरे आणि भुसे समर्थकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भुसे यांनी केलेल्या राजकीय खेळीने हिरे समर्थक दुखावले नसते तरच नवल.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT