Dattatray Panasare addresses the media during the controversy over his alleged withdrawal from the Ahmednagar Legislative Council election. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLC Election : विधानपरिषद निवडणुकीत बोगस सहीने उमेदवारी अर्ज मागे? अहिल्यानगर कलेक्टर ऑफिसमध्ये दुपारपासून हायव्होल्टेज ड्रामा

अहिल्यानगर विधानपरिषद निवडणुकीत दत्तात्रय पानसरे यांनी आपल्या नावाने बनावट माघारी अर्ज दाखल झाल्याचा आरोप केला. जिल्हाधिकारी कार्यालयात तासन्तास गोंधळ सुरू राहिला असून प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

Pradeep Pendhare

MLC Election : विधानपरिषदेच्या अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत गुरुवारी (4 जून) अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी दुपारी दोन वाजता सुरु झालेला हायव्होल्टेज ड्रामा संध्याकाळी 7 वाजले तरीही सुरुच होता. सुचकाने बनावट अर्ज देऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा दावा करत अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी आपण अर्ज मागे घेतलाच नसल्याचे म्हंटले आहे. या वादावर जिल्हाधिकारी कार्यालयात अद्यापही सुनावणी सुरुच आहे.

अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यासह श्रीरामपूरचे काँग्रेसचे नगराध्यक्ष करण ससाणे, राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, शेवगावचे कमलेश गांधी व अकोल्याचे मच्छिंद्र धुमाळ यांनी अर्ज दाखल केले होते. आज उमेदवारी अर्ज माघारीची दुपारी 3 पर्यंतची अखेरची मुदत होती. करण ससाणे यांनी पक्षाद्वारे नव्हे तर अपक्ष अर्ज दाखल केल्याने तसेच दत्तात्रय पानसरे यांनीही प्रेशर टॅक्टिज म्हणून अर्ज भरल्याची चर्चा असल्याने ही निवडणूक ऐनवेळी बिनविरोध होणार असे चित्र होते.

आज अर्ज माघारीच्या दिवशी कोण व कधी अर्ज मागे घेतो, याची उत्सुकता होती. सर्वात आधी दुपारी एकच्या सुमारास मच्छिंद्र धुमाळ यांनी माघार घेतली. त्यानंतर पावणे दोनच्या सुमारास करण ससाणे व कमलेश गांधी यांनी माघार घेतली. शेवगाव-पाथर्डीच्या भाजप आमदार मोनिकाताई राजळे गांधी यांना घेऊन आल्या होत्या. त्यानंतर पानसरेंच्या आगमनाची प्रतीक्षा होती. माघारीसाठी 3 वाजेपर्यंतच मुदत होती. त्यामुळे ते कधी येतात, याची प्रतीक्षा प्राजक्त तनपुरे यांच्या समर्थकांना होती.

पानसरे येण्यापूर्वीच त्यांच्या माघारीचा अर्ज सूचक असलेल्या एमआयएमच्या नगरसेवकाने दाखल केल्याचे वृत्त पसरले. हे वृ्त्त ऐकून पानसरे तिथे आले अन् गोंधळ सुरु झाला. प्रशासनाला प्राप्त झालेला माघारीचा अर्ज आपला नाही व त्यावरील सहीही आपली नाही, अशी भूमिका घेत पानसरे यांनी माघारीच्या अर्जाला आक्षेप घेतला. माझा अर्ज वैध करावा, असे त्यांचे म्हणणे होते. प्रशासनाने त्यास प्रतिसाद दिला नसल्याने अखेर त्यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडून अर्ज वैध झाला नाही तर आत्मदहनाचा इशारा दिला. याचवेळी त्यांनी राज्य पणन महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामाही माध्यमांसमोर जाहीर केला.

नेमका कोणत्या नगरसेवकाने दिला अर्ज?

एमआयएमचे नगरमध्ये शहेनाज खालिद शेख व सय्यद शहाबाज अहमद हे दोनच नगरसेवक आहेत. या दोन नगरसेवकांपैकी नेमका कोणी हा अर्ज दिला, याचा संभ्रम आहे. हा अर्ज त्यांनी निवडणूक अधिकार्‍यांना देण्यासाठी त्यांना प्राधिकृत केले असल्याचे उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचे पत्रही माघारीच्या अर्जासोबत जोडले होते. मात्र, त्यांना प्राधिकृत केल्याचे जे पत्र आहे, त्यावरील पानसरेंची सही ही खरी नाही, असा आक्षेप अन्य अनुमोदकांनी घेतला.

पानसरेंच्या उमेदवारीवर दहा सूचक व अनुमोदक असताना केवळ एकाच सूचक-अनुमोदकाच्या अर्जावर पानसरेंचा अर्ज माघारी कसा धरला गेला, असा आक्षेप घेतला गेला. हा सारा गोंधळ सुरू असताना पानसरे स्वतः तेथे आले. त्यांनीही निवडणूक अधिकार्‍यांशी चर्चा केली व नंतर संतप्त होत बाहेर येऊन माध्यमांसमोर भूमिका मांडली. दरम्यान, पानसरे यांनी आधीच 2 जून रोजी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना पत्र देऊन, माझ्या अनुपस्थितीत केवळ सूचक वा प्रस्तावकामार्फत माझी उमेदवारी मागे घेण्यात येऊ नये, असे स्पष्ट केले असल्याचे समजते.

आई-वडिलांना स्मरून सांगतो, ती माझी सहीच नाही : पानसरे

यावेळी पानसरे म्हणाले, मी स्वतः आल्याशिवाय माझा माझा माघारीचा अर्ज वैध करू नये, असे पत्र मी आधीच दिले होते. माझ्यावतीन दिलेल्या माघारीच्या अर्जावर माझी सही नाही. आई-वडिलांना व सर्व नगरसेवकांना स्मरून सांगतो ती माझी सही नाहीच, असे माध्यमांसमोर स्पष्ट करून पानसरे म्हणाले, माझी माघारीचा अर्ज बनावट (डुप्लिकेट) आहे, त्यावरील माझी सही डुप्लिकेट आहे. जिल्हाधिकार्‍यांनी चुकीच्या पद्धतीने काम केले असेल तर मी आत्मदहन करील, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला.

माझा पणन महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मी आज माध्यमांसमोर जाहीर करीत आहेत. मी राष्ट्रवादीचा व अजितदादांचा कार्यकर्ता आहेत. पक्षाने मला उमेदवारी भरण्यास सांगितले नव्हते. आज मी पणन महासंघाचा राजीनामा देत आहे. 461 मतदारांवर कुठल्याही पद्धतीने अन्याय होणार नाही व मी तो होऊ देणार नाही. त्यामुळे माझा उमेदवारी अर्ज वैध मानल्याशिवाय मी येथून हटणार नाही. मी कोणालाही प्राधिकृत केलेले नाही. सूचक-अनुमोदकापैकी कोणालाही प्राधिकृत केले नाही. त्यामुळे माझा अर्ज वैध केल्याशिवाय मी येथून हलणार नाही. येथून मी उमेदवारी निश्चित झाल्याचे समजल्यावरच जाईल किंवा माझे धड (मृतदेह) जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT