Eknath Khadse News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse News: एकनाथ खडसे यांना जिवे मारण्याची धमकी; दोन दिवसांत चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून...

Muktainagar Police Station:चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून खडसे यांना १५ आणि १६ एप्रिल रोजी फोनवरून ही धमकी दिली असल्याचे खडसे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Mangesh Mahale

Jalgaon News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती समोर येत आहे.

याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात (Muktainagar Police Station) तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद नोंद केली आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून खडसे यांना १५ आणि १६ एप्रिल रोजी फोनवरून ही धमकी दिली असल्याचे खडसे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार आहे, असे फोनवरून धमकी देणाऱ्याने खडसेंना सांगितले. पहिल्यांदा असा फोन आल्यानंतर खडसेंनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा फोन आला. "तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. तुम्हाला ही लोकं मारणार आहेत,' अशी धमकी त्यांना देण्यात आली. असे फोन चार ते पाच वेळा खडसेंना आल्यानंतर त्यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाणे गाठले.

हे फोन उत्तर प्रदेशातून लखनऊ आणि अमेरिकेतून आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. एकनाथ खडसे यांना यापूर्वीही कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून धमकी देण्यात आली होती.

आठ वर्षांपूर्वीही खडसेंना फेसबुकवर जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. खडसे यांच्या नावाने अनंत पाटील आणि सुनील पाटील या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून ठार मारण्याची धमकी असल्याची पोस्ट फैजपूर येथील एका युवकाने त्यांच्या फेसबुकवर टाकली आहे. त्यातील एक तरुण मुक्ताईनगरचा तर एक एम.जे कॉलेजचा विद्यार्थी असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.

गेल्या काही दिवसांपासून खडसे हे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खडसेंनी आपण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश होणार असल्याचे समजते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT