Mahayuti Goverment and Ladki Bahin Yojana : महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावात होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर तर दिलेच, शिवाय लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्यावरून आमदार रवी राणा आणि आमदार महेश शिंदे यांनाही त्यांचा नामोल्लेख न करता सुनावल्याचं दिसून आलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले, 'लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेतला. तर या ठिकाणी काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं. कुणी म्हणालं तुम्ही महिलांना विकत घेता का?, कुणी म्हणालं तुम्ही महिलांना लाच देता का? अरे नालायकांनो तुम्हाला कधीतरी बहिणींचं प्रेम समजेल की नाही? अरे बहिणीच्या प्रेमाचं मोल नसतं. बहिणी जेव्हा प्रेम करतात, भरभरून करतात. भावासाठी काहीही करण्याची इच्छाशक्ती बहिणींमध्ये असते. त्यामुळे या 1500 रुपयांमध्ये बहिणीचं प्रेम कुणीही विकत घेऊ शकत नाही.'
तसेच 'हे 1500 रुपये तर आमच्या बहिणींना दिलेली भाऊबीज आहे. हे प्रेम आहे, आम्ही तुमच्या प्रेमातून उतराई होऊ शकत नाही, परंतु जी काही राज्याची क्षमता आहे त्यातून आमच्या बहिणीच्या संसाराला थोडासा हातभार आमचाही लागला पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली आहे.' असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
याचबरोबर 'परवा एक नेते म्हणाले 1500 रुपयांमध्ये काय होतं माझा त्यांना सवाल आहे, तुम्हाला संधी मिळाली होती, तेव्हा फुटकी कवडी देखील आमच्या माता-भगिनींना मिळाली नव्हती. आता आम्ही 1500 रुपये देत आहोत तर तुमच्या पोटात का दुखत आहे? भगिनींनो या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान रहावं लागेल, कारण त्यांना तुम्हाला मिळणारे 1500 रुपये पचत नाही.' असा आरोपही फडणवीसांनी केला.
याशिवाय 'आमचेही काही मित्र गमतीगमतीत बोलताना काही बोलतात, कुणीतरी म्हणतं पैसे वापस घेऊ अरे वेड्यांनो या देशात भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते. त्यामुळे काहीही झालं तरी एक गोष्ट मी सांगतो, निवडणुका येतील जातील कोणी मत देईल देणार नाही. पण मला विश्वास आहे माय-माऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठिशी असेल.'
तसेच, 'जोपर्यंत हे त्रिमुर्तीचं सरकार आहे तोपर्यंत माय-माऊलींची योजना कुणाचा बाप बंद करू शकणार नाही. कोणी तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही, कोणी आढावा घेऊ शकणार नाही.' अशा शब्दांमध्ये आमदार रवी राणा आणि आमदार महेश शिंदे यांनां देवेंद्र फडणवीस यांनी सुनावत स्पष्ट केलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.