DCM Devendra Fadnavis  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis : फडणवीस यांचे दुसऱ्यांदा आश्वासन; राहुल आहेर यांना मंत्री करणार!

Assembly Election 2024: महाविकास आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारावेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देवळा येथे सभा झाली.

Sampat Devgire

Nashik News : विधानसभा निवडणूक जवळ आली असून मतदानाला तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. महाविकास आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारावेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देवळा येथे सभा झाली. भाजपचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रचारासाठी आले असताना त्यांनी मोठी घोषणा केली.

यावेळी फडणवीस यांनी सभेत तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो, अशी घोषणा केली. विशेष म्हणजे 2019 च्या निवडणुकीत देखील उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देवळा येथील सभेत डॉ. आहेर यांना मंत्री करू, अशी घोषणा केली होती. गेल्या पाच वर्षात प्रत्येक मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर डॉ. आहेर यांच्या नावाची चर्चा होत राहिली. प्रत्यक्षात ते मंत्री होऊ शकले नाहीत. याची आठवण देखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

ते म्हणाले, गेल्यावेळी मी असे आश्वासन दिले होते. पण आमचे सरकारच आले नाही. त्यानंतर जेव्हा आमचे सरकार आले. त्यात अशी काही स्थिती निर्माण झाली की, मंत्रिमंडळ विस्ताराला संधीच मिळाली नाही. त्यामुळे आम्ही डॉ. आहेर यांना न्याय देऊ शकलो नाही. यावेळेस मात्र मी त्यांना हमखास मंत्री करणार आहे. तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो. निवडणुकीत ते विजयी झाले की, पहिल्याच बैठकीत ते मंत्री होतील आणि मतदारसंघात परततील. तुम्ही त्यांना वीस हजारांच्या आत मताधिक्य दिले तर राज्यमंत्री आणि 20 हजारापेक्षा अधिक मताधिक्य दिले तर कॅबिनेट मंत्री करीन, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील भाजप (Bjp) सरकारने शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्याचा संकल्प केला आहे. विजेची बिले माफ करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांसाठी यापुढे दिवसा वीज मिळेल. त्यासाठी कोणतेही बिल आकारले जाणार नाही असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या विकासासाठी खास लक्ष घातले आहे. त्यासाठी त्यांनी राज्यात लखपती दीदी योजना राबवली. त्याचा कार्यक्रम नुकत्याच जळगाव येथे झाला. आगामी काळात महाराष्ट्रात 50 लाख महिलांना लखपती दीदी करण्यात येईल. या योजनेतून महिला स्वयंरोजगारातून लक्षात होतील.

चांदवड देवळा मतदारसंघात देखील किमान 25 हजार महिलांना या योजनेत सहभागी करून घेण्याचे काम आमदार डॉ. आहेर यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये विविध घोषणा केल्या आहेत. महिलांना उच्च शिक्षणात मोफत शिक्षणाची सुविधा करण्यात येईल. त्याचबरोबर युवक विद्यार्थ्यांना देखील शिक्षणासाठी असेच प्रोत्साहन देण्याची आमची योजना आहे. आमच्या सरकारने सर्व जाती धर्माच्या आणि समाज घटकांना न्याय देत त्यांच्या उत्थानासाठी काम केले आहे, असे काम आजवर कोणत्याही सरकारला करता आलेले नाही, असा दावा त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT