Nashik News : चौथे विश्व साहित्य संमेलन नाशिक येथे होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन आणि मराठी भाषा गौरव दिना निमित्ताने पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले असते मात्र ते थोडक्यात टळले. याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न सुरू आहे. काही लोकांनी आज माझी गाडी अडविण्याचे ठरवले होते. मात्र दुर्दैवाने माझी गाडी पुढे निघून गेली. त्यामुळे त्यांचा कार्यक्रम काही होऊ शकला नाही. मी त्यांची क्षमा मागतो. तुम्ही माझी गाडी अडवून शकला नाही. परंतु, कांद्याचा प्रश्न महत्वाचा असून त्यावर लवकरच बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
राज्य शासनाच्या वतीने आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 27) फेब्रुवारी रोजी गंगापूर रोडवरील के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या प्रांगणात तयार करण्यात आलेल्या कुसुमाग्रज साहित्य नगरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आदी उपस्थित होते.
संमेलनातील भाषण पूर्ण होत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाता जाता कांदा प्रश्न व त्यांचा ताफा अडवण्याचा योजनेवर भाष्य केले. कांद्याचे भाव एक हजार रुपयांपेक्षा खाली घसरल्यामुळे ग्रामीण भागात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे सत्र सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा अडवण्यापर्यंत पोहोचणार होते. त्याची माहिती फडणवीसांनी दिली.
फडणवीस म्हणाले, तुम्ही गाडी अडवू शकले नाहीत, तरी तुमचा प्रश्न महत्वाचा आहे. नाशिकचे मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे व गिरीश महाजन यांनीही कांदा प्रश्नावर बैठक घ्यावी म्हणून पत्र दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
दरवर्षी आपण कांदा प्रश्नावर तोडगा काढत असतो, तसाच तोडगा याहीवर्षी काढून कांदा उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिलं. वैश्विक बाजारामुळे दरवर्षी काहीतरी अडचण कांदा उत्पादकांवर येते. युतीचे सरकार आल्यापासून अशा अडचणीत आपण उत्पादकांच्या पाठिशी उभे राहतो, तसेच उत्पादकांच्या पाठिशी सरकार उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.
उद्घाटन सोहळ्यात डॉ. भालचंद्र नेमाडे यांना साहित्य भूषण पुरस्काराने, श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने तर शांतिब्रह्म मारूतीबाबा कुरेकर यांना विश्व मराठी संंमेलन विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.