Nashik Politics : नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आली. भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. १२२ पैकी ७२ जागा भाजपला मिळाल्या. नाशिकमध्ये भाजपच्या हिमगौरी आहेर आडके या महापौर झाल्या आहेत. नाशिककरांनी भाजपवर दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नाशिक महापालिकेत नाशिककरांनी प्रेमरुपी दिलेल्या विश्वासाची परतफेड करण्याची वेळ आली असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. नाशिक जिल्ह्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहिल असा शब्द देताना येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून येत्या दोन वर्षांमध्ये नाशिकचा चेहरामोहरा बदलवू. नाशिकमध्ये शाश्वत विकास साधला जाईल, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली आहे.
नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनलच्या विस्तारित इमारतीचे भुमिपूजन रविवारी (ता.८) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. कुंभमेळा विचारात घेता नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. या विस्तारीकरणानंतर विमानतळावरील प्रवासी क्षमतेत तिप्पटीने वाढ होईल. पण, सोबतच नाशिकच्या सर्वांगिण विकासाचे उड्डाण होईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त आठ ते दहापट भाविक येणार आहेत. त्यांना अधिक सुविधा देण्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत आहेत. विस्तारीकरणामुळे प्रवाशी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. कृषी क्षेत्रात नाशिक अग्रेसर जिल्हा असल्याने निर्यातीला तसेच औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे.
या विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे विमानच भरारी घेणार नाही, तर नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेणार आहे. दावोस दौऱ्यात नाशिकसाठी 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती वाढणार आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यात 30 हजार कोटी रूपयांची विविध विकास कामे होणार आहेत. गोदावरी नदी निर्मल राहण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. नाशिकचा परिक्रमा मार्ग हा नाशिकचे ग्रोथ इंजिन ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मागील सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षितपणे पार पडला. त्या साठी साधू- संत, महंत यांचे सहकार्य लाभले होते. यावेळेसही त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कामे सुरू आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्य सरकार कुठलीही कसर ठेवणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.