Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis Politics : समृद्धीच्या उद्घाटनचं ठिकाण बदललं... शिंदेंच्या ठाण्याला डावलत फडणवीसांचा इगतपुरीला मान

Samruddhi Mahamarg inauguration venue shifted to Igatpuri, bypassing Thane : पूर्वी उद्घाटन कार्यक्रम ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे निश्चित करण्यात आला होता. मात्र आता हे ठिकाण बदलल्यामुळे श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.

Ganesh Sonawane

Samruddhi Mahamarg : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या व अखेरच्या टप्प्याचे काम पूर्ण होऊनही लोकार्पणाचा मुहूर्त काही ठरत नव्हता. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी (१ मे) ला समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले नाही, ते पुढे ढकलण्यात आलं होतं. मात्र आता आमणे-इगतपुरी या शेवटच्या ७६ किलोमीटरच्या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त अखेर ठरला असून गुरुवारी ५ जून ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे सकाळी अकरा वाजता समृद्धीच्या तिसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाने दिली आहे. पूर्वी उद्घाटन कार्यक्रम ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे निश्चित करण्यात आला होता. मात्र आता हे ठिकाण बदलल्यामुळे श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.

सुरुवातीला तिसऱ्या व शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण कुणाच्या हस्ते करायचे यावरुन श्रेयवाद होता. त्यामुळे १ मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत होते. त्यामुळे त्यांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन होते. मात्र तेही पुढे ढकलण्यात आले. इगतपुरी-आमणे, भिवंडी या शेवटच्या व महत्वाच्या टप्प्याचे लोकार्पण रखडले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे या टप्प्याचे लोकार्पण करण्याचे ठरले होते. मात्र प्रत्यक्षात आता ठिकाण बदलून इगतपुरीत शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होत असल्याने एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याला डावलून फडणवीस यांनी इतपुरीत लोकार्पण ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किमीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण २६ मे २०२३ ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते. आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या हस्ते तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण हे ११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते.

एमएसआरडी तर्फे उभारण्यात येणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे याअगोदरच उद्घाटन होणे अपेक्षित होते, मात्र त्यासाठी विलंब झाला आहे. त्याला कारण कुठेतरी श्रेयवादाची लढाई असल्याचेही बोलले जात आहे. समृद्धी महामार्गाचा ६२५ किलोमीटरचा महामार्ग यापूर्वीच खुला झालेला आहे. मात्र शेवटच्या इगतपुरी ते आमणे या ७६ किलोमीटरच्या टप्प्याचे काम पूर्ण होऊनही शासकीय पातळीवरून विलंब झाला.

दरम्यान, नाशिक-मुंबई हा प्रवास आता अवघ्या तीन तासांतच होणार आहे. तर मुंबई नागपूर अंतर आठ तासांत गाठता येईल. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुंबई व नागपूर ही दोन मोठी शहरं जोडली गेली असून त्याचे अनेक फायदे होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT