Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

विकासकामांचा बॅकलॉग हमखास भरून काढणार

Sampat Devgire

लासलगाव : कोरोनाकाळात (Covid19) विकासकामांवर मर्यादा होत्या; परंतु आता शासनाने (State Government) निधी खर्चास परवानगी दिल्याने नवीन विकासकामांसोबतच कामांचा बॅकलॉगही भरून काढणार असल्याचे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ (Chhgan Bhujbal) यांनी सांगितले. येवला येथील जळगाव नेऊर व निफाड येथील शिरवाडे (वाकद) येथे शुक्रवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पालकमंत्री भुजबळ म्हणाले, की विकास ही न थांबणारी प्रक्रीया असून, हा विकास अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मार्चपर्यत रस्त्याची कामे जलदगतीने पूर्णत्वास न्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात द्राक्ष उत्पादन जास्त होते. शासनाने वायनरी संदर्भात घेतलेला निर्णय द्राक्ष उत्पादकांच्या हिताचा आहे. यातून नक्कीच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही ते म्हणाले.

या वेळी भुजबळ यांच्या हस्ते घरकुल योजना लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप शिरवाडे (वाकद) येथील अशोक मोरे, रवींद्र निकम, पोपट पवार, दत्तात्रय आवारे व भगवान चिताळकर या पाच घरकुल योजनेच्या लाभार्थ्याना प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.

शिरवाडेत लोकार्पण

ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत प्रभावतीनगर येथे सामाजिक सभागृह कामासाठी १२ लाख, एकात्मिक बालविकास प्रकल्प योजनेंतर्गत अंगणवाडी बांधकामासाठी आठ कोटी ५० लाख, मूलभूत सुविधांतर्गत सामाजिक सभागृह कामासाठी दहा लाख, जिल्हा परिषद १५ वा वित्त आयोगस्तर विकास कामांतर्गत भूमिगत गटार कामासाठी तीन लाख, पंचायत समिती १५ वा वित्त आयोगस्तर विकास कामांतर्गत कॉक्रीटीकरणासाठी चार लाख, ग्रामपंचायत स्तर वित्त आयोगांतर्गत आवारे बस्ती येथे स्ट्रिट लाईट बसविण्यासाठी एक कोटी ९९ लाख, प्रभावतीनगर येथे सार्वजनिक शौचालयासाठी दोन कोटी ६० लाख, १५ वा वित्त आयोगांतर्गत सार्वजनिक विहिर दुरुस्तसाठी एक कोटी ३० लाख, स्मशानभूमीसंबंधी कामांसाठी बारा लाख या कामांचे लोकार्पण तसेच जलजीवन मिशन योजनेंतगर्त ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी एक कोटी ६० लाख, आमदारांचा स्थानिक विकास योजनेंतर्गत शिरवाडे येथे कॉक्रीटीकरणासाठी १५ लाख, अंतर्गत भूमिगत गटार कामासाठी तीन लाखांच्या कामांचे भूमिपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले.

जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जयदत्त होळकर, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ अर्चना पठारे, येवला उपविभागीय अधिकारी विजय शर्मा, तहसीलदार शरद घोपरडे, प्रमोद हिले, सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता पी. टी. सोनवणे, पोलिस निरिक्षक राहुल वाघ, कार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपकार्यकारी अभियंता उमेश पाटील, सरपंच डॉ. श्रीकांत आवारे आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT