Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना चांगलेच शेकलं. या प्रकरणात आरोप झाल्याने धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. करुणा शर्मा यांनीही त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत. त्यानंतरही त्यांना बेल्स पाल्सी आजाराने ग्रासलं. त्यांच्याकडे पूर्वी असलेलं अन्न व नागरी पुरवठा खाते मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आलं. या सगळ्या घडामोडी व राजकीय वादळानंतर त्यांनी मन:शांतीच्या शोधात नाशिकच्या इगतपुरी येथील विपश्यना केंद्र गाठलं.
त्यानंतर धनंजय मुंडे यांनी इगतपुरी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विश्व विपश्यना धम्मगिरी केंद्रातील दहा दिवसांची साधना पूर्ण केली. २१ तारखेपासून सुरु झालेल्या या शिबीरात त्यांनी आनापान साधनेचा अभ्यास करत मन:शांतीचा अनुभव घेतला. साधना पूर्ण करुन रविवारी (ता. १) पहाटे ते आपल्या पक्षाच्या कोणत्याही नेत्याला न भेटता व प्रसारमाध्यमांना टाळून आपल्या निवासस्थानी निघून गेले.
धनंजय मुंडे यांची भेट घेण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते काल सकाळी धम्मगिरीच्या मुख्य द्वारावर आले होते. मात्र, मुंडे साहेब पहाटेच मुंबईला गेले असल्याचे त्यांना सांगण्यात आले. काही प्रसारमाध्यमेही त्यांना भेटण्यासाठी येणार असल्याने त्यांनी पहाटेच जाणे पसंत केले असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.
२१ मे ते १ जूनदरम्यान दहादिवस ते या शिबिरात राहिले. त्यांनी आत्मशांतीसाठी 'आना पान' ही साधना केली. शनिवारी (ता. ३१) मंगल मैत्री हा साधनेचा शेवटचा दिवस होता. या दिवशी सर्व साधना करणारे साधक एकमेकांना भेटतात व आपला परिचय देतात. मात्र, धनंजय मुंडे हे कोणालाही भेटले नसून, त्यांनी आपल्या कक्षात राहणे व साधनाच करणे पसंत केले होते. साधना शिबिर संपल्यावर साधारण सकाळी आठला सर्व साधकांना घरी जाण्यासाठी सोडण्यात येते. मात्र, मुंडे हे रविवारी पहाटेच मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
आनापान साधना म्हणजे ध्यान (meditation) ची एक पद्धत, ज्यामध्ये श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित केले जाते. या साधनाद्वारे मन एकाग्र होते आणि शांत राहते. विपश्यना ध्यानात आनापान साधना एक महत्त्वाचा भाग आहे. आनापान ही विपश्यना ध्यानाची पहिली पायरी आहे. यामध्ये व्यक्ती आपल्या नैसर्गिक श्वासोच्छवासाचे निरीक्षण करते. हे तंत्र सोपे, वैज्ञानिक आणि सर्वधर्मीय आहे. श्वास नेहमी उपलब्ध असल्याने, तो ध्यानासाठी आदर्श साधन मानला जातो. आनापान साधनेत श्वासावर लक्ष केंद्रित करून मनाची एकाग्रता वाढवली जाते. यामुळे भीती, चिंता आणि तणाव कमी होण्यास मदत होते. हे तंत्र सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी उपयुक्त आहे आणि मनाच्या कार्याची अंतर्दृष्टी प्रदान करते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.