Peoples gathering at Dhanoor Village
Peoples gathering at Dhanoor Village  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मुदत आज संपणार, धनूरचे ग्रामस्थ शिवाजी महाराजांचा पुतळा हलवणार का?

Sampat Devgire

धुळे : धनूर (ता. धुळे) (Dhule) येथे शासनाची परवानगी नसताना छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अश्‍वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. त्यामुळे गावात तीन दिवस तणावाचे वातावरण होते. यात कर्तव्यात कसूर केल्याने मंगळवारी पंचायत समितीने ग्रामसेविका आणि प्रांताधिकाऱ्यांनी पोलिस पाटलाला निलंबित केले. तसेच गावात शनिवारपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला. पुतळा काढून घेण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) ग्रामपंचायतीला दिलेला अल्टिमेटम बुधवारी संपतो आहे. यानंतरच्या कार्यवाहीकडे जिल्ह्याचे लक्ष असेल.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी धनूर येथे विनापरवानगी उभारलेला पुतळा काढून घेण्यासंदर्भात ग्रामपंचायतीला बुधवारपर्यंत मुदत दिली आहे. या आदेशाचे पालन ग्रामपंचायतीने केले नाही तर गुरुवारी (ता. २४) किंवा नियोजनानुसार प्रशासनाकडून पुतळा हटविला जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने पोलिस आणि महसूल यंत्रणा संयुक्त कारवाईतून पुतळा काढेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अखेर दोघे निलंबित

जिल्हाधिकारी, सीईओंच्या आदेशानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी धनूरच्या ग्रामसेविका सुरेखा भिवसन ढोले यांना निलंबित केले. रजा, वरिष्ठांची पूर्वपरवानगी, अनधिकृतपणे गैरहजर, विनापरवानगी मुख्यालय सोडणे, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ग्रामपंचायतीतील कार्यक्रमास अनुपस्थित, तसेच शासकीय निर्देशानुसार ग्रामपंचायत कार्यालयात जयंती साजरी न करणे, शासनाची परवानगी नसताना गावठाण जागेत अनधिकृतरीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविला तरी वरिष्ठ कार्यालयास माहिती न देणे, कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे आदी ठपके ठेवत प्रशासनाने ग्रामसेविका ढोले यांना निलंबित केले. तसेच कर्तव्यात कसूर केल्याने पोलिस पाटील संदेश रोहीदास पाटील यांनाही प्रांताधिकाऱ्यांनी निलंबित केले.

तणावपूर्ण शांतता कायम

धनूर येथे ग्रामपंचायत कार्यालयालगत १८ फेब्रुवारीला मध्यरात्रीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा विनापरवानगी पुतळा उभारल्याने धुळे तालुक्‍यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये व शांततेचा भंग होवू नये, तसेच धनूरच्या गावठाण हद्दीतील पुतळा काढताना कुठलीही अनुचित घटना होऊ नये यासाठी प्रथम ग्रामपंचायत हद्दीत सोमवारपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू होता. मात्र, तरीही ग्रामस्थ संघटित होत होते. सरपंच सत्यभामाबाई शिंदे, ग्रामसेविका ढोले यांना बुधवारपूर्वी पुतळा काढून घेण्याबाबत प्रशासकीय नोटीस बजावणीनंतरही त्यांनी मंगळवारी सायंकाळनंतरही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तणावपूर्ण शांततेची स्थिती अद्याप कायम आहे.

शाळा, दुकाने बंद

या परिसरात बाहेरील समाजकंटक प्रवेश करून विविध माध्यमांद्वारे शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुतळा काढताना अनुचित घटना होऊ नये म्हणून प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी धनूर येथे शनिवारपर्यंत (ता. २६) जमावबंदी व मनाई आदेश लागू केला आहे. धनूर ग्रामपंचायत हद्दीत इतर कोणत्याही व्यक्‍तीने अथवा समुदायाने प्रवेश करू नये. परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्‍तींनी जमू नये, शस्त्र व हत्यार बाळगू नये, परिसरातील सर्व दुकाने व आस्थापना, शाळा बंद ठेवावीत, असा आदेश प्रांताधिकारी धोडमिसे यांनी दिला आहे.

पुतळा बसविला नाही : सरपंच

धनूर येथे ग्रामपंचायतीने पुतळा बसविलेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने तो काढण्याचा प्रश्‍नच येत नाही, असा युक्तिवाद सरपंचांचे प्रतिनिधी करताना दिसतात. त्यामुळे ग्रामपंचायतीने पुतळा काढण्यात असमर्थता दर्शविल्याने सरतेशेवटी प्रशासनाला संयुक्त कार्यवाही करावी लागेल, असे चित्र समोर येत आहे. दरम्यान, लाखो रुपयांचा पुतळा धनूर येथे रातोरात कुणी बसविला याचा तपास पोलिस यंत्रणाही करत आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT