Ahilyanagar Murder Case : अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरजसिंह राजपूत उर्फ परदेशी याच्या हत्या प्रकरणात पाकिस्तान आणि फिलिस्तीन कनेक्शन असल्याचे सत्ताधारी नेत्यांनी केलेले दावे गंभीर असल्याचे सांगत, या प्रकरणाची केंद्रीय गृह विभागाच्या माध्यमातून CBI चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर महानगर प्रमुख किरण काळे यांनी केली आहे.
धीरजसिंह राजपूत याच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीने 50 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी तसेच त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला अहिल्यानगर महापालिकेत नोकरी द्यावी, अशी मागणीही काळे यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात शिवसेना ठाकरे पक्षाने (Shivsena UBT) जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पत्र दिले असून, धीरजसिंह हत्या प्रकरणातील कथित आंतरराष्ट्रीय कनेक्शनची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल केंद्रीय गृह विभागाकडे पाठवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
किरण काळे यांनी सांगितले की, धीरजसिंह राजपूत हे धर्माभिमानी आणि हिंदुत्ववादी (Hindu) विचाराचे होते. त्याच्या हत्या प्रकरणातील हल्लेखोरांना रसद पुरवण्यात आल्याचे तसेच आरोपींचे पाकिस्तान आणि फिलिस्तीनपर्यंत कनेक्शन असल्याचे दावे काही सत्ताधारी नेत्यांनी सार्वजनिकरित्या केले आहेत.
काळे यांच्या म्हणण्यानुसार, संग्राम भंडारे यांनी एसपी कार्यालय चौकातील सभेत आरोपींना रसद पुरवली गेल्याचा आणि त्यांचे फिलिस्तीन-पाकिस्तानपर्यंत कनेक्शन असल्याचा दावा केला. आमदार संग्राम जगताप यांनीही प्रकरणातील निष्पन्न होणारे आरोपी फिलिस्तीनचे समर्थन करणारे असल्याचे म्हटल्याचा दावा काळे यांनी केला. तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही लोकांकडून भारतविरोधी घोषणा दिल्या जात असल्याचा आरोप केल्याचेही त्यांनी नमूद केले. या सर्व दाव्यांची तपास यंत्रणांनी स्वतंत्रपणे पडताळणी करावी, अशी मागणी काळे यांनी केली आहे.
“सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी केलेले हे दावे जर खरे असतील, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यांच्याकडे ही माहिती कुठून आली? आरोपींचे पाकिस्तान किंवा फिलिस्तीनमधील कोणाशी संबंध आहेत का? त्यांना परदेशातून रसद पुरवली गेली का? अहिल्यानगरमध्ये त्यांचे अन्य साथीदार आहेत का? या प्रकरणात संशयास्पद आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार झाले आहेत का?” असे प्रश्न किरण काळे यांनी उपस्थित केले. शहरालगत लष्कराचा मोठा तळ असल्याने अहिल्यानगर संवेदनशील भाग असल्याचे सांगत, या दाव्यांची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी त्यांनी केली.
काळे यांनी पुढे म्हटले की, या प्रकरणासंदर्भात भाजपच्या संबंधित लोकप्रतिनिधींकडे उपलब्ध असलेली माहिती तपास यंत्रणांनी अधिकृतपणे नोंदवून घ्यावी. आवश्यक असल्यास त्यांची न्यायालयासमोर साक्ष नोंदवावी आणि संबंधित पुरावे तपासात समाविष्ट करावेत. आंतरराष्ट्रीय किंवा दहशतवादी कनेक्शनचा पुरावा आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
धीरजसिंह राजपूत हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता सत्यशोधक तपास करावा, असे आवाहनही काळे यांनी केले. मारेकऱ्यांविरोधात न्यायालयात दोष सिद्ध होईल, असे सबळ पुरावे गोळा करावेत, उर्वरित आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करावी आणि या प्रकरणामागील संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली. धीरजसिंह यांच्या श्रद्धांजलीसाठी अहिल्यानगरमध्ये दोन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, हत्या प्रकरणातील दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा होणे हीच धीरजसिंह यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे किरण काळे यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.