Ahilyanagar Murder Case : अहिल्यानगरमधील धीरजसिंह राजपूत उर्फ परदेशी यांच्या हत्या प्रकरणाने आता नवे राजकीय वळण घेतले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी थेट पोलिसांच्या तपास पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
प्रमुख आरोपींना पाठीशी घातले जात आहे का, तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करून प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होत आहे का, असा सवाल जगताप यांनी केला आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी अतिरिक्त पोलिस (Police) अधीक्षक वैभव कलबुर्मे आणि शहर पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांच्यावरही गंभीर आरोप केले. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना लक्ष्य करून त्यांना विविध गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका असून, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
मुकुंदनगर परिसरात धीरजसिंह राजपूत यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आमदार जगताप (Sangram Jagtap) सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत आहेत. आता त्यांनी तपासाच्या दिशेवरच संशय व्यक्त करत प्रमुख आरोपींवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याकडे तपास सोपवण्याची मागणी केली आहे.
जगताप यांच्या मते, पोलिसांनी अद्याप या प्रकरणातील मुख्य आरोपी निश्चित करून त्याला अटक केलेली नाही. आतापर्यंत अटक करण्यात आलेले आरोपी हे हल्लेखोरांना मदत करणारे असल्याचा दावा करत, मुख्य सूत्रधाराला वाचवले जात आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
धीरजसिंह यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणीही जगताप यांनी केली आहे. या प्रकरणात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे हत्या प्रकरणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न होत आहे का, अशी शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या सर्व मुद्द्यांसह आमदार संग्राम जगताप लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. प्रमुख आरोपींवर तातडीने कारवाई करावी, तपासासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा आणि प्रकरणाच्या तपासात पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी ते मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपींच्या कथित अनधिकृत घरांवरील कारवाईला देण्यात आलेली स्थगिती तातडीने उठवून पुढील कारवाई करण्यात यावी, अशीही त्यांची मागणी आहे. आरोपींना तातडीने अटक करून खटल्यात प्रभावीपणे बाजू मांडण्यासाठी सक्षम सरकारी वकील नियुक्त करावा, अशी मागणी जगताप यांनी केली आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या प्रकरणातील पोलिस तपासाबाबत आता लोकप्रतिनिधीकडूनच गंभीर आरोप झाल्याने धीरजसिंह हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. मुख्यमंत्री स्तरावर या तक्रारीची दखल घेतली जाते का आणि तपासाबाबत पुढील निर्णय काय होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.