Dhule Politics : धुळे महापालिका निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती फिस्कटली आहे. तर शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये काही जागांवर एकमत आहे तर काही जागांवर तळ्यात मळ्यात आहे. त्यामुळे भाजप येथे स्वबळावरच लढणार हे फिक्स झाले आहे. तर राष्ट्रवादी-शिवसेनेचं काय होतं हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान मंगळवारी ता. (३०) महायुतीच्या तीन्ही घटक पक्षांमधील इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी-शिवसेना यांचे समीकरण जुळले व वेळेवर युती झाल्यास दोन्ही पक्षांनी काही जागांवर माघार घ्यावी लागणार आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेने आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे मैत्रीचा हात पुढे केला असून प्रत्यक्षात राष्ट्रवादीची साथ शिवसेनेला मिळते का हे पाहावे लागणार आहे.
राष्ट्रवादी व शिवसेनेत एकमत न झाल्यास मात्र दोन्ही पक्ष भाजपप्रमाणेच स्वबळाचे रणशिंग फुंकतील. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेले भाजप, शिवसेना,राष्ट्रवादी हे तीन्ही पक्ष धुळे महापालिकेत एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसतील.
तर दुसरीकडे महाविकास आघाडी मनसेसह एकत्रित लढणार आहे. महाविकास आघाडीचा जागाचा वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित झाला असून, काँग्रेस ३०, शिवसेना ठाकरे गट-मनसे ३०, तर राष्ट्रवादी शरद पवार गट १४ जागांवर लढणार आहे. एमआयएमनेही जवळपास ३० जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.
युती का तुटली?
शिवसेनेने सुरूवातीला २१ जागांची मागणी केली, नंतर ती १७ वर आली. सोमवारी शिवसेनेने ११ जागांचा प्रस्ताव दिला असता, भाजपने केवळ ४ जागा देण्याची तयारी दर्शवली. भाजपकडून होणारी ही अडवणूक आणि वेळकाढू धोरण पाहता, ‘आणखी वेळ घालवला तर भाजप शून्य जागा देईल,’ अशी भीती शिवसेनेत निर्माण झाली. परिणामी, स्वाभिमान जपण्यासाठी शिवसेनेने युती तोडण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
आम्ही भाजपच्या प्रतिसादाची वाट पाहिली, पण त्यांच्याकडून सन्मानजनक वागणूक मिळाली नाही. शिवसेनेकडे १८६ इच्छुक उमेदवार असून, आम्ही मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसशी युतीसंदर्भात चर्चा करत आहोत असे आमदार गावित यांनी सांगितले.
भाजपसोबत युती नकोच
भाजपसोबत सुरू असलेल्या चर्चांच्या फेऱ्या केवळ वेळकाढूपणासाठी होत असल्याची जाणीव होताच, शिवसेनेच्या संपर्कप्रमुख आणि आमदार मंजुळा गावीत, जिल्हाप्रमुख मनोज मोरे, सतीश महाले आणि महानगरप्रमुख संजय वाल्हे यांनी “यापुढे भाजपसोबत युती नकोच” असा ठाम पवित्रा घेतला. तळागाळातील शिवसैनिकांची भावना आणि नाराजी लक्षात घेऊन, शिवसेनेने त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीचा प्रस्ताव मांडला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.