SIR Hearing Nashik News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : गर्भवती महिलेच्या घरी जाऊन SIR सुनावणी, निवडणूक आयोगाने नियमांसोबत माणुसकीही जपली

SIR Hearing Nashik News : सध्या SIR अभियानांतर्गत दावे व हरकतींवरील सुनावणीची कार्यवाही सुरू आहे. त्यात दिंडोरी निवडणूक प्रशासनाच्या संवेदनशील कार्यपद्धतीचा अनुभव आला.

Ganesh Sonawane

Nashik Election Administration : निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत सध्या दावे व हरकतींवरील सुनावणीची कार्यवाही सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर दिंडोरी मतदार संघात नाव नोंदणी असलेल्या, परंतु नाशिक येथे उपचार घेत असलेल्या गर्भवती महिलेला दिंडोरी नगरपंचायत कार्यालयातील सुनावणी केंद्रावर उपस्थित राहण्याची नोटीस देण्यात आली होती.

मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव नाशिक ते दिंडोरी प्रवास करणे तिच्यासाठी अशक्य व धोकादायक असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने संवेदनशीलता व तत्परता दाखवत थेट तिच्या घरी जाऊन सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली.

दिंडोरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संदीप चौधरी यांनी संबंधित महिलेची वैद्यकीय परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, दिंडोरी आप्पासाहेब शिंदे यांच्या परवानगीने आवश्यक कार्यवाही केली.

निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करतानाच नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ नये, याची दक्षता घेत SIR पथकाने दिंडोरीहून नाशिक गाठले. पथकाने संबंधित महिलेच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन आवश्यक कागदपत्रांची पडताळणी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत दावे-हरकतीवरील सुनावणी पार पाडली.

प्रशासनाच्या या संवेदनशील आणि नागरिककेंद्री भूमिकेमुळे संबंधित महिला व तिच्या कुटुंबीयांनी निवडणूक प्रशासनाचे आभार मानले. शासकीय कामकाजासाठी नागरिकांना कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात, या पारंपरिक प्रतिमेला छेद देत प्रशासनाने नागरिकांच्या अडचणीची दखल घेऊन थेट त्यांच्या दारी सेवा उपलब्ध करून दिल्याने या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी मुख्याधिकारी तथा अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संदीप चौधरी, बीएलओ पर्यवेक्षक व प्रशासकीय अधिकारी विजय देवरे, बीएलओ जयराम राठोड आणि संगणक प्रचालक श्वेताली आहेर उपस्थित होते.

नागरिकांच्या सुविधेला प्राधान्य देत नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि संवेदनशील प्रशासनाचा हा उपक्रम प्रशासकीय कार्यपद्धतीचा अनुकरणीय नमुना ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT