Ram Shinde-Asha Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Shinde Advice to Son : ‘तू स्टेजवर (राजकारणात) यायची घाई करू नको’; व्यासपीठाकडे निघालेल्या मुलाला राम शिंदेंचा सल्ला

राजेंद्र त्रिमुखे

Nagar News : दीपावलीनिमित्त सध्या राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या कार्यक्रमांना हजेरी लावताना नेतेमंडळींची धावपळ होत आहे. अनेक कार्यकर्ते नेत्याला सहकुटुंब येण्याचा आग्रह करतात. भाजपचे नगर जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, अध्यक्ष असलेल्या प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण प्रतिष्ठानच्या वतीने आमदार राम शिंदे यांनाही एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. सपत्नीक व्यासपीठावर आलेले राम शिंदे यांनी मात्र स्टेजवर येऊ पाहणाऱ्या आपल्या मुलाला इतकी घाई करू नकोस, असं म्हणत राजकारण्यांची सध्या कौटुंबिक काय अडचण होते, याची मार्मिक पद्धतीने प्रचिती दिली. ('Don't be in a hurry to get on stage (in politics)'; Ram Shinde's advice to his son)

कर्जत शहरात सलग ११३८ दिवस श्रमदान करून शहर स्वच्छ व सुंदर ठेवणाऱ्या सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांचा सपत्नीक माजी मंत्री राम शिंदे आणि आशा शिंदे यांच्या हस्ते एकवीस हजार रुपये व भगवत गीता देऊन सन्मान करण्यात आला. सचिन पोटरे अध्यक्ष असलेल्या प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने हा सत्कार करण्यात आला. राम शिंदे यांनी पोटरे यांच्या या उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी कार्यक्रमास ‘सपत्नीकच यावे लागेल, असा केलेला आग्रही सर्वांसमोर सांगितला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सचिन पोटरे यांनी कार्यक्रमाला यावं लागेल आणि तेही सपत्नीक यावं लागेल, असा आग्रह धरला होता, त्यामुळे मी सपत्नीक कार्यक्रमाला आलो आहे. त्याचबरोबर माझं पिल्लूही (मुलगा) घेऊन आलोय. आमदार शिंदे यांनी हा उल्लेख करताच प्रेक्षकांमध्ये बसलेला आमदार शिंदे यांचा मुलगा लोकांच्या आग्रहाखातर स्टेजकडे निघाला. मात्र, त्याला थांबवत, ‘तू एवढ्या लवकर स्टेजवर येण्याची घाई करू नकोस,’ असं आमदार शिंदे यांनी म्हणत मार्मिक समज दिली. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

हसत-हसत राम शिंदे म्हणाले की, आम्हा राजकारण्यांची अवस्था सध्या खूपच अवघड आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचं मन जपावं लागतं. एवढंच नव्हे तर सपत्नीक या, सहकुटुंब असा आग्रह असेल तर त्यांनाही कार्यक्रमाला आणावं लागते. वास्तविक आम्हालाही कुटुंबासाठी वेळ मिळत नाही आणि त्यामुळे कुठेतरी अशा कार्यक्रमाला सहकुटुंब जाण्याचं भाग्य आम्हाला कधीतरी मिळतं.

स्टेजवर येऊ पाहणाऱ्या मुलाला राम शिंदे यांनी थांबवलं आणि एवढ्या लवकर स्टेजवर येऊ नको, असं सांगितल्यानंतर शिंदे यांच्या पत्नी आशाताई यांनी त्यांच्या कानात कुजबूजत ‘आताही नको आणि यापुढेही नको’ असं सांगितले आहे, असे खुद्द राम शिंदे यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

सध्या राजकारणात दिवस-रात्र समाजात फिरावं लागतं. त्यामुळे कुटुंबाला अजिबात वेळ देता येत नाही, त्यामुळे घरचे मला अगोदरच वैतागलेले आहेत. त्यात मी मुलाला थोडं थांब, असं सांगितलं की त्यांनी (पत्नीने) लगेच आता राजकारण घरात नकोच, असं त्यांचं मत झाल्याचं दिसून येतंय, पण कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या प्रेमापोटी आणि नागरिकांच्या अपेक्षापूर्तीसाठी लोकांमध्ये यापुढेही मी असेल. लोकांचे प्रेम मिळत राहो, हीच अपेक्षा आहे, असं भावनिक आवाहनही राम शिंदे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT