Mahayuti Nandurbar News: महायुती सरकारमध्ये सहभागी तिन्ही पक्ष आगामी निवडणुकीत एकत्र लढतील असे वारंवार सांगितले जाते. भाजप नेत्यांनी त्याबाबत जाहीरपणे घोषणाच केलेली दिसते. मात्र ही घोषणा प्रत्यक्षात कितपत येणार याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
राज्यातील महायुती सरकारला येत्या दिवाळीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. या निमित्ताने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे. अशा स्थितीत विरोधक महायुती पुढे तग धरेल का? अशी चर्चा अपरिहार्य आहे.
महायुतीच्या घटक पक्षांतील स्थानिक नेत्यांमध्ये मात्र वेगळेच विसंवादाचे आणि आपल्या राजकीय वर्चस्वाचे वारे वाहू लागले आहेत. यामध्ये नंदुरबार जिल्हा आघाडीवर दिसतो. भाजपचे माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांद्वारे मतदारांवर प्रभाव पाडण्यात व्यस्त आहेत. या कार्यक्रमात महायुतीच्या अन्य पक्षांना त्यांनी हद्दपार केले आहे.
नुकत्याच झालेल्या एका भांडी व घरगुती साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील हा वाद विकोपाला गेला. डॉ गावित यांच्या पुढाकार्याने भांडी वाटपाचा कार्यक्रम होता. त्यात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे चिरंजीव गेले असता त्यांना गावित समर्थकांनी घोषणा देत एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षातील वादाला नव्याने चालना मिळाली.
नंदुरबार नगरपालिकेवर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉ गावित यांना पराभवायला सामोरे जावे लागले. खासदार हिना गावित यांचा पराभव डॉ गावित यांच्या जिव्हरी लागला आहे. या निवडणुकीत गावित विरोधकांनी काँग्रेसचे डॉ गोवाल पाडवी यांच्या मागे छुपी ताकद उभी केल्याची चर्चा होती.
लोकसभेतील पराभवाचा सूड डॉ. गावित यांनी विधानसभा निवडणुकीत घेतला. माजी खासदार हिना गावित यांनी अपक्ष उमेदवारी करीत मत विभागणी करून काँग्रेसचे आमदार के. सी. पाडवी यांचा पराभव घडवून आणला होता. त्याचा मोठा फटका जिल्ह्यातील सर्व काँग्रेस उमेदवारांना बसला. विशेष म्हणजे या जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या सर्व जागा काँग्रेसकडे होत्या.
आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्हा परिषदेत डॉ. गावित कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी, काँग्रेस तसेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष पडद्यामागून कामाला लागला आहे. या स्थितीत आमदार रघुवंशी यांना कोणत्याही परिस्थितीत नंदुरबार शहरावरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी डॉ गावित यांचा मोठा अडसर आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात महायुतीच्या पक्षांमध्ये एकोपा निर्माण होणे दुराप्रास्त बनले आहे. महायुती परस्परांविरोधात उमेदवार देऊन निवडणुकीची तयारी करीत असल्याचे चित्र आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.