Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar news : अजित पवार यांचे सहकारी मंत्रीच जिल्हा बँकेचे थकबाकीदार!

Sampat Devgire

NDCC Bank News : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंत्रिमंडळातील व गटातील सहकारीमंत्रीदेखील या बँकेचे थकबाकीदार आहेत. उपमुख्यमंत्री पवार त्यांच्याबाबत काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे. (Previously MSC bank officers have work for NDCC Bank doesn`t fruitfull)

नाशिक (Nashik) जिल्हा मध्यवर्ती बँक (Cooperative) आर्थिक अडचणीत आहे. तिला या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकांचा पर्याय सुचवला आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची थकबाकी, संचित तोटा आणि विविध समस्यांमुळे ‘नाबार्ड’ने बँकिंग परवाना रद्द करण्याबाबतची अंतिम नोटीस पाठविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या बँकेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बँकेला या अडचणीतून बाहेर काढण्याचा मार्ग म्हणून राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी बँकेचे कारभार पाहावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचविले आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यासाठी एक चार सदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा पाया, शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्याचा मुख्य स्रोत असणाऱ्या या बँकेला आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी बँकेची भांडवल पर्याप्तता वाढविण्यासह इतरही विविध उपाययोजना कराव्या लागतील. यासंदर्भात अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासह कृती आराखडा तयार करण्यासाठी समिती गठीत करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

थकबाकी ही या बँकेची मुख्य समस्या आहे. त्यात अनेक प्रतिष्ठित व सत्ताधारी पक्षाच्या राजकीय नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये अगदी उपमुख्यमंत्री पवार यांच्या गटातील एका वरिष्ठ सहकारी मंत्र्यांचादेखील समावेश आहे. त्यामुळे खरोखर प्रभावी उपाय करायचे तर पवार आपल्या सहकारी मंत्र्याला थकबाकी भरायला सांगतील काय?, असा प्रश्न पडतो.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, नितीन पवार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT