sharad pawar, Eknath Khadse sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse : होय, मुक्ताईनगरात भाजपला मदत केली, एकनाथ खडसेंची धक्कादायक कबुली

Eknath Khadse On Muktainagar election : एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये नगरपंचायत निवडणुकीत भाजपला मदत केली, असा आरोप शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला होता. त्यावर खडसेंनी मोठी कबुली दिली आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon Politics : मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीवेळी मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रपवार पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवली होती. आमच्याकडे उमेदवार नाहीत आणि निवडणूक लढवण्यासाठी लागणारा पैसा नाही असं कारण देत निवडणुकीतून माघार घेतली. खडसेंनी एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला नव्हता.

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत मुख्यत्वे भाजप आणि शिवसेना यांच्यात लढत झाली. खडसे यांनी आपल्या स्नुषा व मंत्री रक्षा खडसे यांना फायदा व्हावा यासाठी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याचा आरोप शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यावेळी केला होता. तसेच राष्ट्रवादीचे नेते असूनही त्यांनी निवडणुकीत भाजपचा छुपा प्रचार केल्याची चर्चा होती. या सर्व प्रकरणावरुन खडसेंना डिवचताना 'राष्ट्रवादीचा नेता भाजपसाठी काम करतो, हा कोणता पिक्चर आहे? असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना लगावला होता.

त्यावर एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांना प्रत्युत्तर देताना धक्कादायक कबुली दिली आहे. हो, मी मुक्ताईनगरमध्ये भाजपला मदत केली आणि हे सत्य स्विकारायला मला कोणतीही अडचण नाही अशी कबुली खडसेंनी दिली आहे. खरं बोलायला काय हरकत आहे. मुक्ताईनगरच्या नगरपंचायत निवडणुकीत मी भाजपला मदत केली. होय, मी भाजपला मदत केली असं खडसेंनी स्पष्ट केलं आहे.

खडसे जळगाव जिल्ह्यातील अनेक नेत्यांना त्रास देत होते, आम्हाला जेलमध्ये टाकले. आमदार चंद्रकांत पाटील यांना त्रास दिला. त्यामुळेच खडसेंना हे भोगावे लागत असल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती. त्यावरुनही खडसेंनी पलटवार केला आहे. होय, मी अनेकांना त्रास दिला, ही बाब खरी आहे. मात्र तो त्रास गुंड आणि भ्रष्ट लोकांना दिल्याचे खडसे म्हणाले.

केवळ जिल्ह्यातच नाही तर जिल्ह्याबाहेरही जे भ्रष्टाचार करतात, गुंडगिरी करतात, त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम मी केलं आहे आणि पुढेही करीन असा इशारा खडसेंनी दिला. गुलाबराव पाटील हे विसरले असतील, पण त्यांच्या आमदारकीच्या काळात प्रचारासाठी मी त्यांना मोठी मदत केली होती. याची आठवण खडसेंनी करुन दिली.

तसेच गुलाबराव एवढी वर्ष झाले मंत्री आहेत. पण ते आपल्या गावची नगरपरिषद निवडून आणू शकले नाही. त्यांनी याबाबत आत्मचिंतन करावं असा सल्ला खडसेंनी गुलाबराव पाटील यांना दिला. मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीनंतर खडसे–पाटील संघर्ष कायम सुरु असून हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT