Jalgaon News: महाराष्ट्र भाजपचा प्रमुख चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. भाजपमध्ये असताना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यावरही त्यांनी फडणवीसांवर थेट टीकेची झोड उठवली होती.
या टीकेला फडणवीसांनी कधीच थेट प्रत्युत्तर दिले नाही.पण पडद्यामागची भूमिका घेऊन त्यांनी खडसेंचा 'करेक्ट कार्यक्रम' केल्याचीही चर्चा दबक्या आवाजात ऐकायला मिळते. मात्र,आता खडसेंनी फडणवीसांविरोधातल्या लढाईत एक पाऊल माघारी घ्यायचं ठरवत थेट दिलजमाईचे संकेत दिले आहेत.
काही दिवसांपूर्वीच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं तब्बल 230 जागा जिंकून सत्तेत धडाक्यात कमबॅक केले होते. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आपल्या नेतृत्वाची जादू दाखवत भाजपने लढवलेल्या 149 जागांपैकी तब्बल 132 जागा निवडून महाराष्ट्र भाजपमध्ये आपणच बॉस असल्याचं दाखवून दिले.
तसेच केंद्रीय नेतृत्वानेही मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांच्यावरच पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचंही दिसून आलं. या सगळ्या घडामोडींमुळे पुढील काळात फडणवीसांशी जुळवून घेण्यात आपलं हित असल्याचं अनेक नेत्यांनी ओळखले आहे. त्यात खडसेंचाही समावेश होण्याची शक्यता आहे.
राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. तसेच कुणीच कुणाचा कायमचा शत्रूही नसतो, हेही गेल्या काही वर्षांमधील राजकीय घडामोडींनी दाखवून दिले आहे. यातच आमदार एकनाथ खडसे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविषयी मोठं विधान केलं.ते म्हणाले, महायुती सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या लाडकी बहीणसारख्या योजनांमुळे महायुतीला अपेक्षापेक्षा जास्त मतं मिळाल्याचं सांगितलं.
एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात असतानाच खडसेंनी मात्र,आपला ईव्हिएमला विरोध नसल्याची भूमिका घेतली आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. पण त्यांनी यावेळी अनेक निकाल हे ईव्हीएमबाबत संशय निर्माण करणारे राहिले आहेत, ते दूर व्हायला पाहिजे अशी मागणीही एकनाथ खडसेंनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, फडणवीसांसोबत आपली कधीच दुष्मनी नव्हती,तो विरोधी पक्षाची भूमिका म्हणून विरोध होता. मात्र,वैयक्तिक आपले त्यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. या त्यांच्या विधानामुळे एकप्रकारे खडसेंनी फडणवीसांशी असलेली कटुता संपवण्याच्या दृष्टीने एक पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीसांविषयी मोठा गौप्यस्फोट केला होता. फडणवीसांनी 2019 मध्ये आपल्याला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, असं खळबळजनक विधान केलं होतं. हे आश्वासन त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन दिल्याचंही खडसे यांनी यावेळी म्हटलं होतं.
देवेंद्र फडणवीसांनी मला 2019 मध्ये एकदा बोलावून घेतले. त्या बैठकीला आम्ही दोघेच होतो. यावेळी फडणवीस म्हणाले, नाथाभाऊ तुमची राज्यपालपदासाठी मी शिफारस करतो. यावर आपण त्यांना देवेंद्रजी खरं सांगा, तुम्ही मला अनेकदा सांगितलं की, हे करणार, ते देणार, पण ते काही झालं नाही. त्यामुळे माझा विश्वास बसत नसल्याचं सांगितलं.
या बैठकीत खडसेंनी राज्यपाल केले तर आनंदाची गोष्ट आहे, पण माझा विश्वास बसत नाही असं म्हटलं. यावर माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो, हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे. मात्र,पुढे काय झालं, मला माहीत नाही पण देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपालपदाचं आश्वासन दिल्याचं आणि त्यासाठी मनापासून प्रयत्न करेन असंही सांगितलं होतं, असा दावा खडसेंनी केला आहे.त्यांनी ही गोष्ट साधारण 2019 मधील असल्याचंही म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.