Eknath Shinde  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde fake PA : एकनाथ शिंदेंच्या तोतया 'पीए'ला अखेर अटक, पती-पत्नीने मिळून 18 जणांना कसं फसवलं?

Eknath Shinde fake PA : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहायक असल्याचे भासवून एका दाम्पत्याने तब्बल १८ जणांना ५५ लाख ६० हजार रुपयांना गंडा घातला. अखेर ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

Ganesh Sonawane

Jalgaon News : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहायक असल्याचे भासवून पाचोरा येथील मूळ रहिवासी आणि सध्या मुंबईत स्थायिक असलेल्या दाम्पत्याने तब्बल १८ जणांना ५५ लाख ६० हजार रुपयांनी गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

या प्रकरणी ८ ऑगस्ट रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित पती-पत्नी फरार झाले होते. तब्बल १७ दिवसांचा शोध घेतल्यानंतर अखेर आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य संशयित आरोपी हितेश संघवीला ठाणे जिल्ह्यातून अटक केली.

पाचोरा येथील (जळगाव जिल्हा) हितेश रमेश संघवी (४९) आणि पत्नी अर्पिता संघवी (४५) यांनी नोव्हेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत स्वतःला तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून लोकांना फसवले. सरकारी नोकरी लावून देणे, रेल्वेचा करार मिळवून देणे तसेच म्हाडा प्रकल्पात कमी दरात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांनी १८ जणांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणाची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे पोहोचताच त्यांनी तातडीने तक्रारदाराला शनिपेठ पोलिसांकडे पाठवले व गुन्हा दाखल झाला.

गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. पोलिस निरीक्षक संदीप पाटील व सहायक निरीक्षक गणेश फड यांच्या पथकाने मुंबईत राहून तपास सुरू केला. १६ ऑगस्ट रोजी पथकाने आरोपी अर्पिता संघवीला अटक केली. तिच्याकडून चौकशी करताना संशयित हितेश संघवी ठाण्यातील कापुरबावडी परिसरात दडून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी झडप टाकली आणि मुख्य आरोपी हितेश संघवीला ताब्यात घेतले.

या फसवणुकीसाठी हितेश संघवीने स्वतःला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील स्वीय सहायक असल्याचे भासवले. त्यासाठी त्याने बनावट ओळखपत्र, खोटे लेटरपॅड आणि खोटी अपॉइंटमेंट लेटर तयार करून दाखवली. यामुळे तरुणांचा विश्वास संपादन करून त्यांनी आर्थिक फसवणूक केली. रेल्वेत नोकरी, म्हाडामध्ये कमी दरात फ्लॅट, रेल्वे विभागातील टेंडर तसेच रेल्वे अधिकाऱ्यांसाठी गाड्या पुरविण्याचे आमिष दाखवून आरोपींनी लोकांना जाळ्यात ओढले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT