Nandurbar Politics Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Nandurbar Politics : शिंदेंनी नंदुरबारला एका दगडात तीन पक्षी मारले !

Maharashtra Politics : अजित पवार गटाचे नवे पालकमंत्री अनिल पाटील यांचे काल नंदुरबारला पहिल्यांदा आगमन झाले

Sampat Devgire

Eknath Shinde Group Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नवे पालकमंत्री अनिल पाटील यांचे काल जल्लोषात स्वागत झाले. या वेळी डॉ. विजयकुमार गावित यांचे राजकीय विरोधक झाडून हजर होते. त्यामुळे आगामी काळात गावित विरोधकांना अच्छे दिन येणार हे नक्की, असे चित्र आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाचे (Ajit Pawar) नवे पालकमंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांचे काल नंदुरबारला पहिल्यांदा आगमन झाले. या वेळी भाजप वगळता शिंदे गटासह डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijaykumar Gavit) यांच्या उत्साहाला अक्षरशः भरती आली होती. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनिल पाटील ठरणार गावितांना आव्हान

अनिल पाटील यांची पालकमंत्री नियुक्ती ही नंदुरबारच्या गावितकेंद्रित राजकारणाला नवे आव्हान देण्याचा प्रयत्न मानले जाते. या जिल्ह्यात बहुतांशी सत्ताकेंद्र भाजपचे डॉ. गावित यांच्या कुटुंबाकडे आहे. त्यामुळे पालकमंत्री असताना केवळ स्वतःचाच गट सांभाळतात, अशी तक्रार त्यांचे कट्टर विरोधक एकनाथ शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने करीत होते.

शिवसेनेसह (शिंदे गट) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीदेखील हीच तक्रार होती. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यावर पालकमंत्र्यांच्या नियुक्तीत गावित यांना मोठा धक्का देत पालकमंत्रिपद काढून घेण्यात आले. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी नंदुरबारमध्ये आपल्या स्वतःच्या पक्षाला चाल दिली. डॉ. गावित यांना धक्का दिला आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचाही फायदा करून दिला. त्यामुळे अनिल पाटील यांची नियुक्ती म्हणजे नंदुरबारच्या राजकारणात एका दगडात तीन पक्षी मारण्याचाच प्रकार ठरला आहे.

गावितांच्या विरोधकांना जल्लोषाची संधी

नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच आलेल्या मदत व पुनर्वसनमंत्री अनिल भाईदास पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी आणि अन्य सर्वच गावित विरोधकांनी फुलांचा वर्षाव करीत जंगी स्वागत केले. जेसीबीच्या साह्याने पालकमंत्री अनिल पाटील यांना भलामोठा हार घालून स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. इतर पक्षांचे नेते व पदाधिकाऱ्यांनीही उपस्थित राहत पालकमंत्री पाटील यांचे स्वागत केले. नंदुरबारला गावित विरोधकांना असा जल्लोष करण्याची संधी दीर्घ कालावधीनंतर मिळाली होती.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT