eknath shinde, JDCC Bank Election  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

JDCC Bank Election : एकनाथ शिंदेंचा आमदार पक्षावरच नाराज; एकही जागा न मिळाल्याने दुखावले, यापुढे अपक्ष लढण्याची तयारी

Chandrakant Patil Expresses Displeasure Over Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकही जागा न मिळाल्याने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वपक्षावरच नाराजी व्यक्त केली आहे.

Ganesh Sonawane

MLA Chandrakant Patil expresses displeasure over seat allocation in the JDCC Bank election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मुक्ताईनगर आणि बोदवड यापैकी किमान एक जागा तरी मिळावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र, त्यांना दोन्ही पैकी एकही जागा न मिळाल्याने त्यांनी स्वपक्षासह महायुतीच्या नेत्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महायुतीत आपल्याला गाफील ठेवण्यात आल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आता शिवसेनेकडून किंवा कोणाकडूनही मदतीची अपेक्षा राहिलेली नाही. यापुढेही मी अपक्ष लढण्यास तयार आहे अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी संताप व्यक्त केला.

​जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरुन भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. जागावाटपाच्या गणितात शिवसेनेच्या इतर सर्व आमदारांना प्रत्येकी एक ते दोन जागा दिल्या आहेत. मात्र, मुक्ताईनगरची जागा शिवसेनेला न मिळता भाजपच्या रक्षा खडसे यांना देण्यात आली. त्यावरुन आमदार पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे.

आमदार पाटील म्हणाले, ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांना जागा मिळाली. माझ्या पदरात मात्र, निराशा पडली. मुक्ताईनगरची जागा भाजपला दिली जात असेल, तर किमान बोदवडची तरी जागा मला मिळावी, अशी मागणी मी केली होती. मात्र, तीही मान्य झाली नाही. सर्व आमदारांना जागा देण्यात आली मात्र, आपल्याला डावलण्यात आल्याने माझ्या मनात मोठी खंत आणि दुःख आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करत मुक्ताईनगरचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला पण तो सुटला नाही. यासंदर्भात बोलताना आमदार पाटील यांनी स्पष्ट केले, की आमदारांच्या नाराजीची ज्याला दखल घ्यायची आहे, तो घेईल. मी एक छोटा कार्यकर्ता असल्याने नेत्यांच्या पुढे जाता येत नाही. माझी आता मुख्यमंत्र्यांना किंवा माझ्या नेत्यांना भेटण्याची अजिबात इच्छा नाही. कोणाजवळ दुःख मांडत आणि रडत बसणे हे माझे काम राहिलेले नाही. जागा का मिळाली नाही, हा माझ्यासाठी संशोधनाचा विषय आहे.

दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष लढण्याचे संकेत दिल्याने ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. चंद्रकांत पाटील हे शिवसेनेला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून पाटील यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले ?

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या नाराजीवर आता एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. चंद्रकांत पाटील हेही आमचा परिवार आहे. काही नाराजी असेल तर त्यांच्याशी चर्चा केली जाईल. मी त्यांच्याशी बोलतो. परिवार आहे. कुटुंब आहे आमचं, त्यांची काय अडचण असेल, ती सोडविली जाईल असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT