Agressive MSEGC Employees at Nashik, Nashik Latest News Updates
Agressive MSEGC Employees at Nashik, Nashik Latest News Updates Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

संपकरी आक्रमक होताच `अदानी`च्या अभियंत्यांनी वीज केंद्र सोडले!

Sampat Devgire

नाशिक : वीज बिल विधेयक (Electricity bill) व इतर मागण्यांसाठी दोन दिवसांचा देशभरात संप (Nationwide strike) पुकारण्यात आलेला होता. संपाच्या दुसऱ्या दिवशी संपकऱ्यांनी मुख्य अभियंता नवनाथ शिंदे (Chief Engeers) यांची गाडी अडवून घेराव घातला. सनदशीर मार्गाने व न्याय हक्कासाठी आंदोलन करीत असताना खासगी कंपनीचे माणसे का बोलावली, याचा जाब विचारला. (Nashik Latest News Updates)

संपकरी कर्मचारी आक्रमक झाल्याने एकलहरे विद्युत केंद्राच्या आवारात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा लागला. प्रशासनाने संपामुळे अदानी उद्योग समुहाच्या उर्जा विभागाच्या अभियंत्यांना वीज ग्रीडच्या संयोजनासाठी बोलावले होते. त्यामुळे हा तणाव आणखीच वाढला. त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तात सायंकाळी सातला अदानी समुहाच्या अभियंत्यांनी वीज केंद्र सोडले.

प्रशासनाच्या प्रतिनिधीने आंदोलकांची बाजू समजून घ्यावी, ही अपेक्षा असताना कोणीही न आल्याने आंदोलकांचा पारा चढला व प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी सुरू झाली. सकाळी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार योगेश घोलप, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव धनवटे, माजी नगरसेवक विशाल संगमनेरे, माजी पंचायत समिती उपसभापती अनिल जगताप, सागर जाधव हे क्रांती मैदानावर आले. श्री. गोडसे यांनी आंदोलनकर्त्यांची भूमिका समजून घेतली.

लोकसभेत कामगारांच्या प्रश्नांविषयी पाठपुरावा जोमाने करू, असे आश्वासन दिले. दुपारी आमदार सरोज अहिरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी तत्काळ मुख्य अभियंता नवनाथ शिंदे यांना बोलावून घेत चर्चा केली. अदानी कंपनीचे कर्मचारी तीनच्या आत येथून जावयास हवे, असे निक्षून सांगितले. मात्र, संपाच्या काळात जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून वीज संच चालवून वीजनिर्मिती करणे गरजेचे आहे. यासाठी कर्मचारी बोलाविले असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

या वेळी एस. आर. खतीब, सूर्यकांत पवार, मल्लन गौडा गुरुवडियार, ललित आल्हाट, वंदना चव्हाण, माया राठोड, ज्योती सोनवणे, रोहिणी पवार, कल्याणी मुळे, प्रभाकर रेवगडे, अंबादास मुसळे, राजेश काळे, सतीश सोनवणे, गणेश छजलानी, श्री. बदादे, रिटा कनोल्ली, प्रियांका धंदर, किशोर बागूल, नाना लोंढे आदींसह कामगार, अभियंते उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT